अर्जुन पुरस्काराच्या यादीत स्थान न मिळालेला बॉक्सर मनोजकुमार आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाविरुद्ध न्यायालयात धाव घेणार आहे. बॉक्सिंगकरता जय भगवान याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. मनोजकुमारने या संदर्भात क्रीडा मंत्रालयाकडे विचारणा केली होती, मात्र त्यांनी पुरस्कार्थीच्या यादीत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. पुरस्कार निवड समितीचे सदस्य व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक जिजी थॉम्सन यांनी सांगितले, बॉक्सिंगकरिता आम्ही सात खेळाडूंच्या नावाची चर्चा केली, मात्र आम्ही एकमताने भगवानची शिफारस केली आहे. त्यामुळे या यादीत बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनोजकुमार म्हणाला, ‘‘या यादीत माझे नाव समाविष्ट करण्याबाबत मला जिजी थॉम्सन, तसेच क्रीडा सचिवांनीही आश्वासन दिले होते. माझ्या भावाने १३ ऑगस्ट रोजी क्रीडा सचिवांची भेट घेतली होती. उत्तेजक औषध सेवन प्रकरणात माझा सहभाग असल्याचा गैरसमज मंत्रालयाने केला होता. माझ्या भावाने या संदर्भात खुलासा केल्यानंतर क्रीडा सचिवांनी माझ्या नावाची शिफारस करण्याची खात्री माझ्या भावाला दिली होती. १४ ऑगस्ट रोजी थॉम्सन यांनी स्वत:हून माझ्याशी संपर्क साधला होता व माझ्यावर अन्याय केला जाणार नाही असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात माझा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. पुढील आठवडय़ात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणी होणार आहे, मात्र अर्जुन पुरस्काराबाबत मला डावलण्यात आल्यामुळे मी या चाचणीच्या सरावावर लक्ष केंद्रित करू शकत नाही.’’‘‘माझ्याबाबत अनेक गैरसमज करून घेण्यात आले आहेत. तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी खोटी आश्वासने देत माझे मानसिक खच्चीकरण केले आहे. हा खरोखरीच माझा अपमान आहे,’’ असे मनोजकुमारने सांगितले. मनोजचे मोठे बंधू व प्रशिक्षक राजेशकुमार यांनी सांगितले की, ‘‘माझ्या भावावर अक्षम्य अन्याय झाला आहे. जर खेळाडूंची अवहेलना होत असेल, तर ते आपल्या देशासाठी कसा नावलौकिक उंचावणार. आम्ही लवकरच चंडिगढ येथील न्यायालयात धाव घेणार आहोत. तसेच आम्ही माहितीच्या अधिकारातही या संदर्भात माहिती मिळविणार आहोत. ही माहिती न्यायालयाला आम्ही सादर करणार आहोत. मनोजने २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्यामुळे यंदाच त्याला अर्जुन पुरस्कार मिळू शकतो. पुढील वर्षी तो पात्र ठरणार नाही. क्रीडामंत्री सर्बानंद सोनवाल यांनी याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही, तर आम्ही न्यायालयीन प्रक्रियेस सुरुवात करणार आहोत.