नवी दिल्ली : जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर प्रीती यादवचे लक्ष्य निश्चितच ऑलिम्पिक खेळण्याचे असले, तरी त्यापूर्वी प्रीतीला आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी आशियाई क्रीडा स्पर्धा ही पहिली पात्रता फेरी असल्यामुळे आधी आपल्याला आशियाई स्पर्धेत खेळायचे असल्याचे प्रीती म्हणाली.

ऑलिम्पिक गट असलेल्या ५४ किलो वजनी गटात प्रीतीने जागतिक स्पर्धेत आपला प्रभाव पाडला. पदकापासून ती वंचित राहिली. उपांत्यपूर्व फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला, तरी बॉिक्सग तज्ज्ञांच्या नजरा वेधून घेतल्या. वयाच्या १९ व्या वर्षी जागतिक स्पर्धेत खेळताना प्रीतीने आपल्या तीनही लढतींत प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ केले. यातही तिने गतरौप्यपदक विजेती आणि रुमानियाच्या अव्वल मानांकित लॅक्रामिओरा पेरिजोस हिचा केलेला पराभव सनसनाटी ठरला होता.

Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
Shreyas Iyer
कोलकाताचा सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रयत्न! आज दिल्ली कॅपिटल्स संघाशी गाठ; श्रेयस, पंतकडे लक्ष
indian squad for t20 world cup
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघनिवड एप्रिल अखेरीस?

लहान वयातही वरिष्ठ गटात खेळण्याच्या अनुभवाने प्रीतीला प्रगल्भ केले. शाळेत असताना अभ्यासाशिवाय दुसरा कसलाच विचार न करणारी प्रीती केवळ वडिलांच्या आग्रहाने बॉक्सिंग खेळायला लागली आणि या खेळाने तिचे आयुष्य बदलून टाकले. ‘‘कुमार आणि युवा गटात खेळताना तुम्ही किती आक्रमक खेळता याला महत्त्व असते. पण, जेव्हा तुम्ही वरिष्ठ पातळीवर खेळायला लागता, तेव्हा तुम्हाला अधिक विचार करून आणि तंत्रपूर्ण खेळ करावा लागतो,’’ असे प्रीती म्हणाली.

जागतिक स्पर्धेसारख्या मोठय़ा व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळाल्यावर खूप काही शिकायला मिळाले असे सांगून प्रीती म्हणाली की,‘‘मला माझ्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला आक्रमक खेळ करून चालत नाही. ताकद आणि तंत्र सुधारण्याकडे मला भर द्यावा लागणार आहे. जर मी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर मला ऑलिम्पिकसाठी तयारी करता येईल. कारण आशियाई स्पर्धा ही ऑलिम्पिकसाठी पहिली पात्रता फेरी असेल.’’

आपल्या बॉिक्सग खेळण्याविषयी प्रीतीने सांगितले की,‘‘मोठय़ा प्रयत्नाने मी बॉिक्सग खेळायला तयार झाले होते. आईला कायम भीती वाटायची. मला कुठे लागेल, मार बसेल याची भीती माझ्यापेक्षा तिला सतत असायची. एक वेळ तर मला सरावानंतर थेट डॉक्टरांकडेच न्यावे लागले होते. पण, याच भीतीने मला निडर बनवले. युवा आशियाई बिक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. त्यानंतर वरिष्ठ गटातूनही खेळण्याची लगेच संधी मिळाली. २०२२ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. उपांत्य फेरीत टोक्यो ऑलिम्पिक विजेत्या सेना ईरीएकडून पराभव पत्करावा लागला. पण, जेव्हा वरिष्ठ गटातून खेळू लागले तेव्हा खऱ्या अर्थाने माझा ब़ॉक्सिंगपटू म्हणून प्रवास सुरू झाला.’’

मला बॉक्सिंग खेळण्यासाठी भरीस पाडण्यात आले. सुरुवातीला प्रशिक्षण घेऊन आल्यावर मी रोज रडत बसायचे. कधी हात दुखायचे, तर कधी पाय दुखायचे. सहा-सात महिने असेच गेले. जेव्हा स्पर्धेत सहभागी व्हायला लागले, तेव्हापासून माझी या खेळातील आवड वाढायला लागली. जेव्हा पदक जिंकू लागले तेव्हा आत्मविश्वास उंचावला.  –  प्रीती यादव