विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व बॉक्सिंग इंडियाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे एल. सरिता देवी हिने २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत किमान कांस्यपदक मिळविण्याचे ध्येय ठरविले आहे. 

दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल सरिता हिच्यावर एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ‘‘सचिन, बॉक्सिंग इंडिया व माझ्या चाहत्यांचे मी शतश: आभारी आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मी पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सरावाकरिता उभी राहू शकणार आहे. तहहयात बंदीच्या भीतीमुळे माझी कारकीर्द संपुष्टात होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र सर्वाच्या सहकार्यामुळे नाममात्र कारवाईवर माझी सुटका झाली आहे. त्यांचा हा पाठिंबा मी वाया घालविणार नाही. रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये मी पदक मिळविण्यासाठीच उतरणार आहे,’’ असे सरिताने सांगितले.

टेनिस : अंकिता रैनाला सनसनाटी विजेतेपद
पुणे : बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता रैनाने महिलांच्या एनईसीसी करंडक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजेतेपद मिळविले. चौथ्या मानांकित अंकिताने सातत्यपूर्ण कामगिरी राखताना अंतिम लढतीत इंग्लंडच्या कॅटी डय़ुन्नीवर ६-२, ६-२ अशी मात केली. डेक्कन जिमखाना क्लबवर झालेल्या या स्पर्धेत अंकिताला विजेतेपद मिळविताना फारशी अडचण आली नाही. घरच्या प्रेक्षकांसमोर तिने परतीचे आक्रमक फटके, बेसलाइन व्हॉलीज व अचूक सव्‍‌र्हिस असा चतुरस्र खेळ केला. या स्पर्धेत १४ वर्षांनंतर प्रथमच भारतीय खेळाडूला विजेतेपद मिळाले आहे. २००१मध्ये पुण्याच्या राधिका तुळपुळेने अर्चना वेंकटरमण हिच्यावर मात केली होती. त्यानंतर एकाही भारतीय खेळाडूला येथे विजेतेपद मिळविता आले नव्हते.

प्रग्यान ओझाच्या गोलंदाजीवर बंदी
नवी दिल्ली : संशयास्पद शैलीमुळे बीसीसीआयने फिरकीपटू प्रग्यान ओझाच्या गोलंदाजावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे ओझाला कोणत्याही मान्यताप्राप्त स्पर्धेत गोलंदाजी टाकता येणार नाही. गोलंदाजीची शैली सुधारण्यासाठी ओझा चेन्नईतील अकादमीत रवाना झाला आहे. ओझावरील बंदीसंदर्भात बीसीसीआयने हैदराबाद क्रिकेट संघटनेला याची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे हैदराबादच्या सेवादलाच्याविरुद्धच्या लढतीतून ओझाचे नाव वगळण्यात आले आहे. ओझाने २४ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्त्व करताना ११३ विकेट्स घेतल्या आहेत. १८ एकदिवसीय सामन्यांत त्याच्या खात्यावर २१ बळी जमा आहेत.

श्रीलंकेची कसोटी वाचवण्यासाठी झुंज
ख्राइस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात फॉलोऑनची नामुष्की स्वीकारल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात आश्वासक प्रारंभ केला आणि पहिल्या क्रिकेट कसोटीत झुंज कायम राखली. न्यूझीलंडने केलेल्या ४४१ धावांना उत्तर देताना लंकेचा पहिला डाव १३८ धावांत कोसळला. त्यांच्या कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने शैलीदार खेळ करीत ५० धावा केल्या. त्याचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज न्यूझीलंडच्या प्रभावी गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट व नील व्ॉगनर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या डावात ३०३ धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने दुसऱ्या डावात बिनबाद ८४ धावा केल्या. त्या वेळी दिमुथ करुणारत्ने (नाबाद ४९) व कौशल सिल्वा (नाबाद ३३) हे खेळत होते.

डू प्लेसिसच्या शतकानंतर पावसाचा खेळ
पोर्ट एलिझाबेथ : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ९९ धावांवर नाबाद फॅफ डू प्लेसिसने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्याच चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने १३ चौकार आणि २ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. जोरदार पावसामुळे उर्वरित वेळात खेळ होऊ शकला नाही. निसरडय़ा खेळपट्टीमुळे पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला. हशीम अमला २३ तर एबी डी’व्हिलियर्स ९ धावांवर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या ३ बाद २८९ धावा झाल्या आहेत.

राज्य मैदानी स्पर्धा : चैताली पाटीलचे तिहेरी यश
पुणे : निगडी येथील खेळाडू चैताली पाटील हिने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला आणि कुमारांच्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत तिहेरी कामगिरी केली. चैतालीने शुक्रवारी सहा वर्षांखालील गटात लांबउडी व तीस मीटर धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. ५० मीटर शर्यतीत श्रावणी पाटील व ज्युलिया मुलाणी यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान घेतले. या गटातील चार बाय ५० मीटर रिले शर्यतीत मुंबईच्या सेंट झेवियर संघाने विजेतेपद पटकाविले. जयहिंद संघाने दुसरा क्रमांक मिळविला. मुलींच्या १० वर्षांखालील गटात राधिका घाडगे (कराड) हिने गोळाफेकीत प्रथम क्रमांक मिळविला. मुलांमध्ये केशर नुनादाई याने गोळाफेकीत प्रथम क्रमांक मिळविला. सांगलीच्या सिद्धी बामणे हिने आठ वर्षांखालील गटात लांब उडीत विजेतेपद मिळविले. चार बाय ५० मीटर रिले शर्यत माझा स्पोर्ट्स संघानेजिंकली. मुलांच्या सहा वर्षांखालील गटात गौरव भोसले याने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम स्थान घेतले.

बुद्धिबळ : विश्वा शाह चमकली
मुंबई : अस्तित्व संस्कार प्रबोधिनी आणि के.एल. ग्रुप यांच्यातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या विश्वा शाहने तामिळनाडूच्या ए.हरिकृष्णनला सामना बरोबरीत सोडवण्यास भाग पाडले. सलग सहा विजय मिळवणारे सम्मेद शेटे आणि तेजस्विनी सागर यांनी संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे. हरिकृष्णन दुसऱ्या स्थानी आहे.

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
मुंबई : मुंबई जिल्हा कॅरम संघटना आणि ब्राह्मण सेवा मंडळ, दादर यांच्यातर्फे २४व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ४ ते १४ जानेवारी या कालावधीत ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम) येथे स्पर्धेचे सामने होणार आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष एकेरी आणि महिला वयस्कर एकेरी अशा चार वैयक्तिक गटांसह आंतर संस्था अ, ब, क यांच्यासह आंतरक्लब अशा आठ गटांत ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेदरम्यान पंचपरीक्षाही होणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या इच्छुक खेळाडूंनी आपली नावे क्लबमार्फत २८ आणि २९ डिसेंबरला दी आंध्र महासभा आणि जिमखाना, दादर हिंदू कॉलनी, मुंबई येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी यतीन ठाकूर ९२२१२५३७१९

या क्रमांकावर संपर्क करावा.
फुटबॉल : कर्नाटक स्पोर्टिग-जीएम लढत बरोबरीत
मुंबई : मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीगच्या एलिट डिव्हिजनच्या लढतीत कर्नाटक स्पोर्टिग असोसिएशन आणि जीएम स्पोर्ट्स यांच्यातील लढत ०-० अशी बरोबरीत सुटली.