नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंगपटू रिंगमध्ये आपली कामगिरी उंचावत असताना, भारतीय बॉक्सिंग महासंघात (बीएफआय) मात्र वेगळाच वाद सुरू आहे. या वादाने बुधवारी नाट्यमय वळण घेतले. महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह आणि सरचिटणीस प्रमोद कुमार यांनी एकमेकांना निलंबित केल्याची दोन स्वतंत्र पत्रे प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे, ही दोन्ही पत्रे महासंघाच्या अधिकृत ‘लेटरहेड’वरूनच जारी करण्यात आली आहेत.
अध्यक्ष अजय सिंह यांनी सरचिटणीस प्रमोद कुमार यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली. या आदेशात कुमार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. आवश्यक मंजुरी न घेता प्रसारण हक्क प्रदान करणे, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा रद्द झाल्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत सहकार्य न करणे आणि अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी बैठक बोलावण्याचा प्रयत्न करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
यानंतर सरचिटणीस प्रमोद कुमार यांनीही अध्यक्ष अजय सिंह यांच्याविरोधात निलंबनाचे पत्र जारी केले. एकतर्फी आणि मनमानी कारभार, घटनेत स्वत:हून बदल करणे, सदस्य संघटनांना धमकावणे, आर्थिक अनियमितता, पदाचा गैरवापर, न्यायालयीन आदेशांचा अवमान आणि तांत्रिक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, असे गंभीर आरोप त्यांनी सिंह यांच्यावर केले आहेत.
दोन्ही निलंबन आदेशांमध्ये संबंधित पदाधिकार्यांना महासंघाचे कोणतेही काम करण्यास, महासंघाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यास तसेच चौकशीशी संबंधित अधिकृत कागदपत्रे हाताळण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अजय सिंह यांनी आपल्या आदेशात हे निलंबन तात्पुरती उपाययोजना असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित आरोप सिद्ध झाले आहेत असा निष्कर्ष काढू नये, असेही त्यांनी नमूद केले आहे.
दुसरीकडे, अध्यक्षांविरोधात यापूर्वीच अविश्वास ठराव आणण्यात आल्याने अजय सिंह यांना मला निलंबित करण्याचा अधिकार नसल्याचा दावा प्रमोद कुमार यांनी केला आहे. २८ ऑक्टोबर रोजी होणार्या विशेष सर्वसाधारण सभेत अंतिम मतदान होईपर्यंत किंवा सक्षम प्राधिकरणाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबन कायम राहील, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. महासंघाच्या सर्वोच्च पदांवरील दोन पदाधिकार्यांनी एकमेकांविरोधातच निलंबनाची कारवाई केल्याने बॉक्सिंग महासंघातील वादाला नवे वळण मिळाले आहे.
