बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोदिया यांनी येथे गुरुवारी आयोजित केलेली कार्यकारिणीची बैठक पुरेशा गणसंख्येअभावी पुढे ढकलण्यात आली असून ३ मे रोजी त्यांच्याविरुद्धच अविश्वासाचा ठराव मांडला जाणार आहे.
जजोदिया यांनी सदस्यांना विश्वासात न घेता येथे बैठक आयोजित केली होती. नवी दिल्ली येथील बैठक आयोजित करण्याचा जजोदिया यांना अधिकारच नव्हता. तो अधिकार संघटनेचे सरचिटणीस जय कवळी यांना असल्याचे अनेक सदस्यांचे मत होते. २० सदस्यांपैकी १६ सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे ही बैठक स्थगित होणार हे निश्चित झाले होते. ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल, असे बॉक्सिंग इंडियाकडून कळविण्यात आले आहे.
बॉक्सिंग इंडियाची ३ मे रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार आहे. या सभेत जजोदिया यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पश्चिम बंगालचे प्रतिनिधी असित बॅनर्जी यांनी सांगितले, ‘‘आम्ही जजोदिया यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडणार आहोत व हा ठराव मंजूर होईल अशी आम्हाला खात्री आहे. जजोदिया यांनी त्यापूर्वीच राजीनामा देणे योग्य होईल.’’
‘‘केवळ सहा महिन्यांपूर्वी ही संघटना स्थापन झाली आहे. त्यामुळे केवळ सहा महिन्यांच्या कारभारावरून जजोदिया यांना अकार्यक्षम ठरविणे अयोग्य आहे. काही सदस्य स्वार्थापोटी त्यांच्यावर विविध आरोप करीत आहेत. या सदस्यांनी आपल्या तक्रारी सविस्तर मांडल्या तर निश्चितपणे त्या दूर केल्या जातील,’’ असे जजोदियांच्या गटातील एका सदस्याने सांगितले.