१५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात वैभव सूर्यवंशी चौकार, षटकारांची लयलूट करत शतकाकडे वाटचाल करत होता. मात्र वेस्ली माढिवरेच्या बॉलिंगवर ब्रॅड इव्हान्सने अफलातून कॅच घेत त्याची खेळी संपुष्टात आणली.
हरारेत सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात वैभवने ४९ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारासह ८१ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात लहान वयाचा शतकवीर होण्याची संधी वैभवकडे होती. मात्र इव्हान्सच्या भन्नाट कॅचने वैभवला तंबूत परतावं लागलं. माढिवरेने फसवा चेंडू टाकला. वैभवने डाऊन द ट्रॅक येत फटका खेळला. लॉन्गऑफला फिल्डिंग करणाऱ्या ब्रॅड इव्हान्सला खूप पुढे यावं लागलं. त्याने वेगात हे अंतर पार करून माशासारखा सूर लगावला. चेंडू जमिनीलगत होण्याआधी इव्हान्सने कॅच पूर्ण केला. कठीण कॅचेस कसे पकडावे याचा वस्तुपाठच इव्हान्सने सादर केला. इव्हान्सने कॅच पूर्ण करताच वैभवच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडत तुफान फटकेबाजी करणाऱ्या वैभवने ऑरेंज कॅपवर नाव कोरलं होतं. याचवर्षी झिम्बाब्वेतच झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने १७५ धावांची अविश्वसनीय खेळी केली होती. वैभवने स्वत:ची निवड करून घेतली अशा शब्दांत निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आपली भूमिका मांडली होती. आयर्लंडविरुद्ध त्याला पदार्पणाची संधी न मिळाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. इंग्लंडविरुद्ध संजू सॅमसनला वगळून वैभवला पदार्पणाची संधी अखेर देण्यात आली.
इंग्लंड दौऱ्यानंतर झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. संजू सॅमसन संघात नसल्यामुळे वैभव तिन्ही सामने खेळणार हे पक्कं झालं. दोन सामन्यात वैभवने आक्रमक सुरुवात केली मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तिसऱ्या लढतीत मात्र पहिल्या चेंडूपासून आत्मविश्वासाने खेळणाऱ्या वैभवने चौकार, षटकारांची लयलूट केली. या दौऱ्यातल्या पहिल्या सामन्यात वैभवने ५० तर दुसऱ्या लढतीत २० धावा केल्या होत्या.
