Laura Cardoso Record: भारतात सध्या आयपीएल सुरू आहे. या स्पर्धेत रेकॉर्डचा पाऊस पाडला जात आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुकुल चौधरीने चौकार षटकारांचा पाऊस पाडून लखनौला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. या सामन्यात गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण ते आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. टी – २० क्रिकेटमध्ये विकेट काढणं हे मुळीच सोपं नसतं. कारण फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे टी -२० क्रिकेटमध्ये कुठल्याही गोलंदाजाने ५ विकेट्स घेतल्याचं प्रमाण खूप कमी आहे. दरम्यान ब्राझीलकडून खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

बीसीए कालाहारी महिला टी -२० ट्रॉफी स्पर्धेत लेसोथो आणि ब्राझील हे दोन्ही महिलांचे क्रिकेट संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ब्राझीलचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना या संघाने २० षटकांअखेर २०२ धावांचा डोंगर उभारला. लेसोथो संघाला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात २०३ धावांचा पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना लेसोथो संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

लेथोसो संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ६.२ षटकात १३ धावांवर आटोपला. लेथोसो संघाचा डाव इतक्या लवकर आटोपण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, ब्राझील संघातील गोलंदाज लॉरा कार्डोसो. या गोलंदाजाने ३ षटकं टाकली. यादरम्यान तिने ९ फलंदाजांना बाद केले. म्हणजे अवघ्या १८ चेंडूत तिने ९ फलंदाजांना माघारी धाडलं. यासह ती टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक ९ विकेट्स घेणारी ती जगातील पहिलीच गोलंदाज ठरली आहे.

याआधी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुरुष किंवा महिलांच्या क्रिकेटमध्ये कुठल्याही गोलंदाजाला ९ विकेट्स घेता आल्या नव्हत्या. याआधी हा रेकॉर्ड पुरुषांच्या टी -२० क्रिकेटमधील भूटानच्या सोनम येशेच्या नावावर होता. त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या. तर महिलांच्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंडोनेशियाच्या रोहमालियाने ७ विकेट्स घेतल्या होत्या. आता ९ विकेट्सचा रेकॉर्ड कोण मोडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.