झुरिच : ब्राझील आणि अर्जेटिना यांची मागणी फेटाळून विश्वचषक पात्रता फुटबॉल सामना पुन्हा खेळण्याचे निर्देश ‘फिफा’ने मंगळवारी दिले आहेत. गतवर्षी करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.

गतवर्षी सप्टेंबरमध्ये उभय संघांमधील सामना सुरू झाला आणि काही मिनिटांत ब्राझिलच्या आरोग्य अधिकाऱ्याने मैदानावर येत अर्जेटिनाच्या काही खेळाडूंनी करोना विलगिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आक्षेप घेतला. हा रद्द करण्यात आलेल्या सामन्याशिवाय ब्राझील आणि अर्जेटिना हे दोन्ही संघ दक्षिण अमेरिकेच्या विभागातील १० संघांमधून विश्वचषकासाठी सहज पात्र ठरले. कतारमध्ये २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी गटनिश्चितीच्या कार्यक्रमातही त्यांना स्थान मिळाले होते. परंतु ‘फिफा’च्या ताज्या आदेशानुसार, ब्राझील-अर्जेटिना यांना शक्यतो सप्टेंबरमध्ये आपला १८वा पात्रता सामना खेळणे आवश्यक आहे.

फेब्रुवारी महिन्यात ‘फिफा’च्या शिस्तपालन समितीने दंड, खेळाडूंचे निलंबन आणि पात्रता सामना पुन्हा खेळवण्याचे निर्देश अशी कारवाई केली होती. त्यानंतर दोन्ही संघांनी ११ जूनला मेलबर्न येथे मैत्रीपूर्ण सामना खेळायचे ठरवले होते. परंतु ‘फिफा’ने दोन्ही संघटनांची मागितलेली दाद फेटाळल्याने संघांना विश्वचषकाआधी दोनदा एकमेकांशी झुंजावे लागणार आहे. दोन्ही संघंटनांकडे ‘फिफा’च्या आदेशाविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

‘फिफा’ने दोन्ही संघांच्या दंड रकमेत कपात केली आहे. ब्राझीलला अडीच लाख स्विस फ्रँक्स आणि अर्जेटिनाला एक लाख स्विस फ्रँक्स दंड ठोठावला आहे. याशिवाय सामना रद्द झाल्याबद्दल दोन्ही संघांना ५० हजार स्विस फ्रँक्स भरावे लागतील.