एपी, रिओ दी जानेरो

बदली खेळाडू म्हणून मैदानावर येताच लुकास पाकेताने झळकावलेल्या निर्णायक गोलच्या बळावर ब्राझिलने शनिवारी बलाढय़ चिली संघाला १-० असे नमवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ब्राझिलच्या गॅब्रिएल जिजसला दुसऱ्या सत्राच्या प्रारंभीच लाल कार्ड दाखवण्यात आल्यावरही चिलीला त्यांचा बचाव भेदणे जमले नाही.

ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नेयमार विरुद्ध अ‍ॅलेक्सी सांचेझ यांच्यातील द्वंद्वाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. परंतु ब्राझिलच्या बचावपटूंनी सांचेझला फारशी संधी दिली नाही. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर ब्राझिलने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला रॉबटरे फर्मिनोच्या जागी पाकेताला बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात आले.

त्यानंतर एका मिनिटातच नेयमारने केलेल्या पासला पाकेताने गोलजाळ्याची दिशा दाखवून ब्राझिलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४८व्या मिनिटाला जिजसने चिलीच्या एग्युइनो मीनाला हवेत पाय मारून खाली पाडल्याने लाल कार्ड दाखवण्यात आले. परंतु तरीही ब्राझिलने आघाडी टिकवली आणि उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

आता ६ जुलै रोजी उपांत्य लढतीत ब्राझिलची पेरूशी गाठ पडणार आहे. २०१९च्या अंतिम फेरीत ब्राझिलने पेरूलाच ३-१ असे नमवून विजेतेपद मिळवले होते. दरम्यान, अन्य उपांत्य लढतीत अर्जेटिना विरुद्ध इक्वेडोर आणि उरुग्वे विरुद्ध कोलंबिया यांच्यातील विजेते आमनेसामने येतील.

पेरूची पॅराग्वेवर सरशी

पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पेरूने पॅराग्वेवर ३-३ (४-३) अशी सरशी साधून उपांत्य फेरीत धडक मारली. निर्धारित वेळेत पेरूसाठी जिआनकुला लॅपाडुला (४०वे मिनिट), योशिमर युतुन (८०) यांनी गोल केले. तर गुस्तावो गोमेझकडून स्वयंगोल झाल्यामुळे ब्राझिलची खात्यात तीन गोल जमा झाले. पॅराग्वेसाठी गोमेझ (११), ज्युनियर अलोन्सो (५४) आणि गॅब्रिएल अव्हालोस (९०) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये मात्र पॅराग्वेच्या तीन जणांना गोल करण्यात अपयश आले. तर पेरूकडून चौघांनी गोल केले. पेरूचा गोलरक्षक प्रेडो गॉलेसीने अल्बटरे इस्पिनोलाची पेनल्टी अडवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.