मुंबई : ब्राझीलने २००२मध्ये पाचवे आणि त्यांचे आजवरचे अखेरचे जगज्जेतेपद पटकावले. त्यानंतर बहुतेक विश्वचषक स्पर्धांमध्ये ब्राझीलचा नामोल्लेख दावेदार म्हणून केला जात नाही. यंदा तर त्यांना उप-उपान्यपूर्व फेरीतच नॉर्वेकडून हार पत्करावी लागली. जर्मनी आणि इटलीप्रमाणेच फुटबॉलमधील या महासत्तेलाही घरघर लागल्याची लक्षणे स्पष्ट दिसू लागली आहेत.
ब्राझीलच्या नावावर सर्वाधिक पाच विश्वविजेतेपदे आहेत. त्यांनी १९५८, १९६२, १९७०, १९९४ आणि २००२मध्ये जगज्जेतेपद पटकवले. तर १९५० आणि १९९८मध्ये जागतिक उपविजेते होते. पण या वैभवशाली परंपरेचे स्मरण अलीकडे कथानके आणि चित्रफितींमधूनच होते. मैदानावर या परंपरेची झलक अलीकडे दिसेनाशी झाली आहे. विश्वचषक २०२६मध्ये तर त्यांना नॉर्वेकडून उप-उपान्त्यपूर्व किंवा ‘राउंड ऑफ सिक्स्टीन’ फेरीतच हार पत्करावी लागली. या टप्प्यावर गारद होण्याची १९९०नंतरची त्यांची पहिलीच वेळ. विशेष म्हणजे हा पराभव फुटबॉलची फारशी जाण नसलेल्यांना धक्कादायक वाटू शकतो. पण फुटबॉल दर्दी आणि विश्लेषकांना या पराभवाचे आश्चर्य वाटत नाही. कारण गेली काही वर्षे ब्राझीलच्या खेळातील उतरण त्यांनी पाहिलेली आहे.
नवीन सहस्रकात अधोगती
इटली, जर्मनी आणि ब्राझील या फुटबॉलच्या तीन महासत्तांच्या बाबतीत एक विलक्षण साम्य आहे. तिन्ही संघांनी नवीन सहस्रकात किमान एकदा जगज्जेतेपद पटकावले. ब्राझीलने आजवर पाच जगज्जेतेपदे पटकावली, तशी जर्मनी आणि इटलीच्या नावावर प्रत्येकी चार जगज्जेतेपदे आहेत. भविष्यात त्यांना गाठण्याची किंवा मागे टाकण्याची क्षमता अर्जेंटिना (३ जगज्जेतेपदे) आणि फ्रान्स (२ जगज्जेतेपदे) या देशांमध्येच फार तर दिसून येते. पण इटली, जर्मनी आणि ब्राझील या तिन्ही संघांची अधोगती जगज्जेतेपद पटकावल्यानंतर लगेचच दिसून आली. ब्राझीलने २००२मध्ये विश्वचषक पटकावल्यानंतर २०१४चा अपवाद वगळता त्यांना दर वेळी उपान्त्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले. घरच्या मैदानावर २०१४मध्ये उपान्त्य फेरीत त्यांना जर्मनीकडून १-७ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. आता तर उप-उपान्त्यपूर्व फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. जर्मनीलाही २०१४मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांच्या वैभवशाली परंपरेच्या तुलनेत पुढील तिन्ही स्पर्धांमध्ये सुमार कामगिरीच करता आली. तीच गत इटलीची. ते २००६मध्ये जगज्जेते होते. पुढील दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांना साखळी टप्पा ओलांडता आला नाही. त्यापुढील तीन स्पर्धांसाठी तर इटली पात्रही ठरू शकले नाहीत.
ब्राझीलला २००२नंतर प्रत्येक स्पर्धेत बाद फेरीच्या टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या युरोपिय देशाने पराभूत केले. फ्रान्स (२००६, उपान्त्यपूर्व फेरी), नेदरलँड्स (२०१०, उपान्त्यपूर्व फेरी), जर्मनी (२०१४, उपान्त्य फेरी), बेल्जियम (२०१८, उपान्त्यपूर्व फेरी), क्रोएशिया (२०२२, उपान्त्यपूर्व फेरी) आणि आता नॉर्वे (२०२६, उप-उपान्त्यपूर्व फेरी). एके काळी युरोपिय संघांमध्ये ब्राझीलचा दबदबा असायचा. ब्राझीलचा संघ प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत उतरतो, तो केवळ जिंकण्यासाठीच अशी त्यांच्याकडून अपेक्षा असायची. अलीकडच्या काळात अशी अपेक्षा त्यांचे कडवे चाहतेदेखील बाळगत नाहीत. त्यांच्या या काळातील अधोगतीची कारणे अनेक असली, तरी नेयमार ज्युनियर या वलयांकित फुटबॉलपटूविषयी फाजील अपेक्षा बाळगणे आणि मैदानावर तो असेल तर त्याच्या भोवताली व्यूहरचना आखून बाकीच्यांना मर्यादित अवकाशातच कौशल्य दाखवण्याची संधी सोडणे ही कारणे प्रमुख असल्याचे फुटबॉल विश्लेषकांनी दाखवून दिले.
नेयमारकडून फाजील अपेक्षा
ब्राझीलमध्ये झालेल्या २०१४मधील विश्वचषकातील एक दृश्य जगभरच्या फुटबॉल रसिकांच्या कायम लक्षात राहील. उपान्त्य फेरीच्या सामन्याच्या आधी नेहमीप्रमाणे ब्राझीलचे राष्ट्रगीत वाजवले गेले. त्यावेळी ब्राझीलचा बचावपटू डाव्हिड लुइझ नेयमारची १० क्रमांकाची जर्सी घेऊन आला होता. उपान्त्य सामन्यात नेयमार खेळू शकणार नव्हता. कारण त्या स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोलंबियाच्या एका बचावपटूने केलेल्या ‘टॅकल’मुळे नेयमारच्या मणक्याला दुखापत झाली. जायबंदी झाल्यामुळे उर्वरित स्पर्धेतच नेयमार खेळू शकणार नव्हता. पण त्याच्या अनुपस्थितीचा नको इतका गाजावाजा ब्राझीलच्या खेळाडूंनी केला. तो खेळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर पर्यायी व्यूहरचनेचा विचारच फारसा झालेला नव्हता. तो खेळणार नाही याचा इतका भावनिक बाऊ केला गेला, की त्यामुळे संपूर्ण संघाची लय आणि एकाग्रता भंगली. परिणामी त्या सामन्यात जर्मनीच्या शिस्तबद्ध आणि ताकदवान संघासमोर ब्राझीलची दैना झाली. पहिल्या अर्ध्या तासातच हा संघ ०-५ अशा अभूतपूर्व पिछाडीवर पडला. नंतर १-७ असा पराभूत झाला. नेयमारच्या पलीकडे पाहण्याची सवयच ब्राझिलियन संघाला किंवा तेथील फुटबॉल व्यवस्थेला नव्हती. पेले, गॅरिंचा, सॉक्रेटिस, रोमारिओ, रोनाल्डो, रोनाल्डिन्यो यांचा दर्जा नेयमारला कधीही दाखवता आला नाही. इतकेच कशाला, पण रिवाल्डो, काका, कॅफू यांची उपयुक्तताही नेयमार सादर करू शकला नाही. तो स्टारच्या नशेत वावरला आणि त्याचे नको इतके फाजील लाड ब्राझीलने केले.
ब्राझिलियन खेळाडू मोठ्या प्रमाणावर युरोपमध्ये खेळत होते. पण देशाकडून खेळताना आवश्यक ती ऊर्जा, जिद्द, इच्छाशक्ती दाखवणे त्यांनी जवळपास सोडून दिले होते. नेयमारची तुलना कधी काळी मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोशी केली जायची. मेसीचा वेग आणि गोल हेरण्याची तसेच करण्याची चलाखी नेयमारने अधूनमधूनच दाखवली. रोनाल्डोची ताकद आणि तंदुरुस्ती त्याला कधीही दाखवता आली नाही. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या नेयमार नेहमीच नाजूक दिसला. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्यो यांचा मानसिक कणखरपणा नेयमारमध्ये कधीही दिसला नाही. मुख्य म्हणजे विश्वचषक स्पर्धांमध्ये ब्राझीलचे वारंवार पतन होत असताना त्याचा परिणाम नेयमारवर होतोय असे कधी वाटलेच नाही. कदाचित हे सर्वच प्रमुख फुटबॉलपटूंना लागू होते. ते देशापेक्षा क्लबकडून अधिक उत्तम प्रकारे खेळतात असा युक्तिवाद केला जातो. अशांनी सध्याच्या स्पर्धेत धुमाकूळ घालणारे मेसी, एम्बापे, हालँड, केन, डेम्बेले यांच्याकडे पाहावे. रोनाल्डोने पोर्तुगालकडून खेळण्यास नेहमीच प्राधान्य दिले. मेसीने त्याच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या उत्तरार्धात अर्जेंटिनाकडून खेळणे मनावर घेतले आणि त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आपला संघ हरल्यानंतर अश्रू ढाळणे यातूनच केवळ देशप्रेम दिसून येते असे वाटणाऱ्यांस नेयमार संवेदनशील फुटबॉलपटू वाटत असेलही. पण ब्राझीलसाठी इतक्या वर्षांमध्ये त्याचे योगदान अपेक्षापूर्ती अजिबात करू शकले नाही हे वास्तव नाकारता येत नाही. तो जायबंदी असूनही त्या विश्वचषकाच्या चमूतून अमेरिकेत घेऊन जाण्याचे खूळ ब्राझिलियन फुटबॉल धुरिणांच्या डोक्यातून जाऊ शकले नाही, यातच सगळे आले.
कालबाह्य डावपेच, व्यूहरचना
ब्राझीलचा भर वेगावर आणि चेंडूवरील नियंत्रणावर असायचा असा एक समज आहे. पण वेळ पडल्यास पूर्णपणे भक्कम बचावावर लक्ष केंद्रित करून गोल होऊ न देणे या डावपेचातही ब्राझीलचे अनेक संघ तरबेज होते. या संदर्भात १९९४मधील ब्राझिलियन संघाचे उदाहरण देता येईल. तो संघ किंवा २००२मधील ब्राझीलचा हे दोन्ही बचावात भक्कम होते. सध्याच्या संघात आधीच्या संघात होते त्या तोडीचे आक्रमक नाहीत किंवा बचावपटूही नाहीत. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ते निभावून नेत असले, तरी दर्जेदार संघांसमोर गळपटतात हे वारंवार दिसून येते. अजूनही ब्राझिलियन फुटबॉल संघटना किंवा तेथील माजी खेळाडू, पत्रकार, विश्लेषक स्मरणरंजनात व्यग्र असल्यामुळे आधुनिक फुटबॉलमधील बदलत्या वास्तवाचे त्यांना भान नाही किंवा त्यानुरूप स्वतःला बदलण्याची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच एके काळच्या या वैभवशाली संघाची आता दैना झालेली दिसते. त्याचे अलीकडे आश्चर्यही वाटेनासे झाले आहे.
siddharth.khandekar@expressindia.com
