विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान शाबूत ठेवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात स्कॉटलंड संघाला आत्मघातकी खेळाचा मोठा फटका बसला. स्कॉटलंडच्या बचावपटूंनी केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा घेताना ब्राझीलने ३-० असा विजय साकारला आणि बाद फेरीतील आपला प्रवेशही निश्चित केला. तारांकित आक्रमक व्हिनिशियस ज्युनियरचे दोन, तर माथेयस कुनियाचा एक गोल ब्राझीलसाठी निर्णायक ठरला.
व्हिनिशियसने सलग तिसर्‍या सामन्यात गोल नोंदवण्याची किमया साधली.

त्याने सातव्या मिनिटाला आणि मध्यंतराला काही सेकंद शिल्लक असताना गोल करत ब्राझीलला पूर्वार्धातच भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणार्‍या खेळाडूंत तो रेयाल माद्रिद क्लबमधील सहकारी किलियन एम्बापे (फ्रान्स) याच्यासह संयुक्त दुसर्‍या स्थानी पोहोचला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी याच्यापेक्षा हे दोघे एका गोलने मागे आहेत.

बचावातील चुकांचा फटका

स्कॉटलंडचे आव्हान स्वत:च्याच चुकांमुळे धोक्यात आले आहे. विश्वचषकातील पहिलाच सामना खेळणार्‍या स्कॉट मॅकेनाने चेंडूवर नियंत्रण मिळवताना विलंब केला आणि ब्राझीलचा युवा आक्रमक रायन याने त्याच्याकडून चेंडू हिसकावून घेतला. त्याने लगेचच व्हिनिसियसकडे पास दिला आणि व्हिनिशियसने गोलरक्षक अँगस गन याला चकवत ब्राझीलला सातव्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही मिनिटांनी स्कॉटलंडचा बचावपटू जॅक हेंड्री याच्याकडून चेंडू हिसकावून व्हिनिशियसने पुन्हा गोल केला.

मात्र, ‘व्हीएआर’च्या हस्तक्षेपामुळे हा गोल रद्द करण्यात आला. चेंडू घेण्यापूर्वी व्हिनिशियसने हेंड्रीला पाडल्याचे निरीक्षण पंचांनी नोंदवले. ब्राझील संघाने याबाबत नाराजी नोंदवली, तरी त्यांचा दबदबा कायम राहिला. पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत स्कॉटिश बचावफळीने पुन्हा एकदा निष्काळजीपणा दाखवला आणि मागील पोस्टजवळ व्हिनिसियसला मोकळे सोडले. त्याने सहज हेडरद्वारे वैयक्तिक दुसरा गोल करत ब्राझीलची आघाडी दुप्पट केली.

उत्तरार्धातही ब्राझीलच सरस

उत्तरार्धात स्कॉटलंडने सुरुवात चांगली केली असली, तरी ब्राझीलने त्यांना आक्रमणाची संधी दिली नाही. कर्णधार अँडी रॉबर्टसन मैदानाबाहेर गेल्यानंतर स्कॉटलंडचा खेळ पुन्हा खालावला. स्कॉटिश खेळाडूंनी दोन वेळा पेनल्टीची मागणी केली, तर स्कॉट मॅकटॉमिनेचा एक जोरदार हेडर ब्राझीलचा गोलरक्षक ॲलिसनने रोखला. त्यानंतर ब्राझीलचा मध्यरक्षक ब्रुनो गिमारेसने केनी मॅक्लीनकडून चेंडू काढून घेतला आणि कुनियाला पास दिला. कुनियाने जोरदार फटका मारत ब्राझीलचा तिसरा गोल नोंदवला. आता स्कॉटलंडला बाद फेरीत प्रवेशासाठी इतर गटांतील निकालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हैतीवर विजय मिळवल्यानंतर उर्वरित सामन्यांत त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

पुनरागमनात नेयमार भावुक

  • ब्राझीलचा आक्रमक नेयमारने बहुप्रतीक्षित पुनरागमन स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत केले. उजव्या पायाच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन
    सामन्यांना मुकलेला नेयमार ७६व्या मिनिटाला मैदानावर आला. त्यानंतर बहुतांश ब्राझिलियन चाहत्यांनी भरलेल्या हार्ड रॉक स्टेडियममध्ये ‘नेयमार…नेयमार’चा गजर सुरू झाला.
  • नेयमारला गोलची संधी मिळाली नाही, पण बर्‍याच काळानंतर मैदानात परत येताना त्याने समाधानकारक खेळ केला. सामन्यानंतर तो भावुक झालेला दिसला. त्याला अश्रूही अनावर झाले. या वेळी चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला आणि त्यानेही हात उंचावून त्यांना अभिवादन केले.
  • आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ब्राझीलकडून सर्वाधिक ७९ गोल नेयमारच्याच नावे आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो तंदुरुस्ती आणि लय मिळवण्यासाठी झगडत आहे. ऑक्टोबर २०२३ पासून तो ब्राझील संघाच्या बाहेर होता. तसेच क्लब स्तरावर सॅन्टोसकडून खेळतानाही त्याला यश मिळत नव्हते. परंतु अनुभवाचा विचार करून प्रशिक्षक कार्लो अँचेलॉटी यांनी त्याला विश्वचषक संघात स्थान दिले.

५ विश्वचषक स्पर्धेत सलग तीन साखळी सामन्यांत गोल करणारा व्हिनिशियस ब्राझीलचा पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी जेर्झिनियो (१९७०), रोमारियो (१९९४), रिवाल्डो (२००२) आणि रोनाल्डो (२००२) यांनी अशी कामगिरी केली होती.

९ स्कॉटलंडने याआधी नऊ वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला असून एकदाही त्यांना बाद फेरी गाठता आलेली नाही. आता ब्राझीलविरुद्धच्या पराभवामुळे त्यांना बाद फेरीत प्रवेश करणे पुन्हा अवघड जाणार आहे.