झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला नमवत इतिहास घडवला. १९ वर्षांपूर्वी पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं होतं. योगायोग म्हणजे या दोन विजयांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे झिम्बाब्वेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन टेलरचा. ब्रेंडन दोन्ही विजयांचा शिलेदार आहे. दोन्ही विजयात संघाचा भाग असणारा तो एकमेव खेळाडू आहे.
२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं होतं. त्या लढतीत ऑस्ट्रेलियाने १३८ धावा केल्या होत्या. अँड्यू सायमंड्सने ३३ तर ब्रॅड हॉजने ३५ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेतर्फे एल्टन चिगंबुराने ३ तर गॅरी ब्रेंटने २ विकेट्स घेतल्या होत्या. ब्रेंडन टेलरच्या ४५ चेंडूत ६० धावांच्या बळावर झिम्बाब्वेने ५ विकेट्स राखून हे लक्ष्य गाठलं. व्हुसीमुसी सिंबादाने २३ तर हॅमिल्टन मासाकाटझाने २७ धावा करत ब्रेंडन टेलरला चांगली साथ दिली होती. ब्रेंडनलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
योगायोग म्हणजे इतक्या वर्षानंतरही म्हणजे २०२६ टी२० वर्ल्डकपसाठीच्या झिम्बाब्वे संघात ब्रेंडन होता. ओमानविरुद्धच्या लढतीत ब्रेंडन खेळलाही. त्याने ३० चेंडूत ३१ धावांची खेळी केली. मात्र याच खेळीदरम्यान दुखापतीमुळे त्याला ड्रेसिंगरुमध्ये परतावं लागलं. मांडीच्या स्नायूंना झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे ब्रेंडन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. ब्रेंडनचा अनुभव पुढच्या सामन्यांमध्ये कामी ठरेल अशी संघाला आशा होती. झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत असतानाच ब्रेंडन उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची बातमी समोर आली. ब्रेंडनच्या जागी बेन करनची संघात निवड करण्यात आली आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय साकारला तेव्हा ब्रेंडन संघाचा भाग होता. यापुढच्या प्रवासात तो संघाचा भाग नसेल. झिम्बाब्वे संघाच्या ऐतिहासिक विजयाचा शिलेदार आणि साक्षीदार होण्याचं भाग्य ब्रेंडनला मिळालं. ४०वर्षीय ब्रेंडनसाठी हा शेवटचा टी२० वर्ल्डकप असू शकतो.
झिमाब्वेचा माजी कर्णधार असलेल्या ब्रेंडनने एकाचवेळी कर्णधार, यष्टीरक्षक आणि सलामीवीर अशा तिन्ही भूमिका निभावल्या आहेत. ब्रेंडनने ३६ टेस्ट, २०७ वनडे आणि ५९ टी२० सामन्यात झिम्बाब्वेचं प्रतिनिधित्व केलं. तिन्ही प्रकारात मिळून ब्रेंडनच्या नावावर १०,००० पेक्षा जास्त धावा आहेत. यामध्ये १८ शतकं आणि ५७ अर्धशतकांचा समावेश आहे. झिम्बाब्वे क्रिकेटच्या वाटचालीत निर्णायक वाटा उचलणाऱ्या खेळाडूंमध्ये ब्रेंडनचा समावेश होतो. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाशी फारकत घेतल्यानंतर ब्रेंडनने कोलपॅक करार स्वीकारून इंग्लंड गाठलं. तिथे काऊंटी क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला. काही वर्षांनंतर ब्रेंडनने झिम्माब्वेत परतण्याचा निर्णय घेतला.
सामना फिक्स करण्यासाठी काही लोकांनी संपर्क केला होता. त्यांनी कोकेनचं आमीष दाखवलं, ब्लॅकमेल केलं. कुटुंबाच्या सुरक्षेच्या भीतीमुळे मी ही गोष्ट आयसीसीला उशिरा सांगितली. पण मी कधीही सामना फिक्स केला नाही असा खुलासा ब्रेंडनने केला होता. फिक्सिंगसंदर्भात उशिरा माहिती दिल्याबद्दल ब्रेंडनवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. बंदीच्या कालावधीत ब्रेंडन रिहॅब प्रक्रियेचा भाग होता. प्रशिक्षणाकडे वळण्याआधी पुन्हा खेळण्याचा निर्णय ब्रेंडनने घेतला. म्हणूनच त्याची वर्ल्डकप संघात निवड करण्यात आली. आयपीएल स्पर्धेत ब्रेंडन सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता.

