Brendon Mccullum on sacking from England Coach: इंग्लंडने कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून ब्रेंडन मॅक्युलम यांना हटवलं आहे. या निर्णयानंतर मॅक्युलम पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत आपली मतं मांडली. इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलमने प्रथमच मौन सोडलं आहे. स्काय स्पोर्ट्सशी संवाद साधताना मॅक्युलमने या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली, तसेच अपेक्षित यश मिळवून देण्यात अपयशी ठरलो याबद्दल चाहत्यांची माफीही मागितली.
२०२२ मध्ये इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा स्वीकारल्यानंतर मॅक्युलमने आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेटची नवी शैली संघात रुजवली होती. मात्र, अलीकडील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (१३ जुलै) स्काय स्पोर्ट्स न्यूजशी बोलताना न्यूझीलंडचा माजी कर्णधार म्हणाला की, हा निर्णय मी समजू शकतो, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रशिक्षकपद हे पूर्णपणे निकालांवर अवलंबून असतं.
“सुरुवातीला मी खरंतर निराश झालो होतो. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेर निकालालाच सर्वाधिक महत्त्व असतं. आम्हाला अपेक्षित निकाल मिळाले नाहीत आणि त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. हा माझ्यासाठी एक प्रकारचा इशाराच होता आणि तो स्वीकारून पुढे जाणं हाच योग्य मार्ग आहे,” असं मॅक्युलम म्हणाला.
“गेल्या चार वर्षांत कसोटी संघासोबत काम करण्याचा मला प्रचंड आनंद मिळाला. क्रिकेटमधील माझ्या दोन दशकांहून अधिकच्या प्रवासात हा काळ सर्वात आनंददायी आणि समाधान देणाऱ्या टप्प्यांपैकी एक होता. गेल्या काही काळात आमच्या संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याबद्दल मला खेद आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारून पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आजवर मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. संघाच्या भविष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत. अपेक्षित निकाल मिळवून देऊ शकलो नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं मॅक्युलमने म्हटलं.
मॅक्युलमने आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीची आठवण काढत सांगितलं की, संघाने नव्या ओळखीची यशस्वी सुरुवात केली होती. “आमची सुरुवात खूप चांगली झाली होती. संघासाठी आम्ही एक नवी आणि सकारात्मक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या ध्येयात किंवा दृष्टिकोनात कधीही बदल झाला नाही. मात्र, अखेरीस ॲशेस आणि भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकांमध्ये अपेक्षित निकाल मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो,” असं मॅक्युलमने स्पष्ट केलं.
कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला असला, तरी मॅक्युलम इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत. यापुढे आपलं संपूर्ण लक्ष इंग्लंडला पुन्हा आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून देण्यावर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. “कसोटी क्रिकेटमधील प्रवास संपला असला, तरी मर्यादित षटकांच्या संघासोबत काम करण्यासाठी माझ्यात आजही प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. इंग्लंडला पुन्हा मोठ्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून देणं हेच आमचं ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असं मॅक्युलमने सांगितलं.
