१८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. जगभरातील कसोटीप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या कसोटीपूर्वी अनेकांनी आपली भाकिते नोंदवण्यास सुरुवात केली असून अनेकांनी भारताला या सामन्यासाठी फेव्हरिट मानले आहे. मात्र, न्यूझीलंडला स्टार माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्क्युलमने वेगळे मत दिले आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे पारडे जड असेल, असे मॅक्क्युलमला वाटते.

इंग्लंडमधील खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार न्यूझीलंडला जास्त फायदा होईल, असे मॅक्क्युलमला वाटते. तो म्हणाला, ”न्यूझीलंडचा या सामन्यापूर्वी या चांगला सराव होणार आहे आणि त्याचा फायदा न्यूझीलंडला होईल. या सामन्यात न्यूझीलंड भारतापेक्षा ६०-४० अशा फरकाने पुढे असेल. हा सामना अटीतटीचा होईल. एक चाहता म्हणून न्यूझीलंड जसा भारताचा आदर करतो, तसाच मीही भारताचा आदर करतो. मला माहित आहे, की त्यांच्यात लढाऊ वृत्ती आहे.”

हेही वाचा – भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी!

१०१ कसोटी सामने खेळणारा माजी यष्टीरक्षक-फलंदाज मॅक्क्युलम म्हणाला, “मला वाटते, की आपण हा रंगतदार अंतिम सामना पाहू. सर्वोत्कृष्ट संघ जिंकेल आणि उत्कृष्ट खेळ खेळला जाईल.”

न्यूझीलंडचा २० सदस्यीय संघ या सामन्यापूर्वी यजमान इंग्लंविरूद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. तर, भारतीय संघ सध्या मुंबईत क्वारंटाइन कालावधीत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारत इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळणार आहे.

हेही वाचा – अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये ‘भूकंप’, कर्णधारालाच हटवलं!

न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, टिम साउथी, डग ब्रॅसवेल, डेव्हन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोमे, जेकब डफी, मॅट हेन्री, काईल जेमीसन, टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, हेन्री निकोलस, एजाज पटेल, रॅचिन मिशेल, मिशेल सँटनर, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॉटलिंग आणि विल यंग.