न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे हार पत्करावी लागली होती. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने यावरुन न्यूझीलंडच्या संघाला सुनावलं आहे. आपल्या आक्रमक खेळीचा योग्य तो वापर संघ करु शकला नाही, याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ विकेट्सने हरवलं. मॅक्युलम म्हणाला की न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आपल्या क्षमतांचा योग्य वापर केला नाही आणि त्यामुळे ही हार पत्करावी लागली. सामन्याला जशी गरजेची होती, तशा आक्रमकतेने ही खेळी करण्यात आली नाही. मॅक्युलम म्हणाला, मला असं म्हणायचं नाही की जिथे बंदुकीची गरज होती तिथे आम्ही चाकू घेऊन गेलो. आम्ही बंदुकच घेऊन गेलेलो पण आम्ही गोळ्या झाडल्या नाहीत. आम्ही थोडे घाबरलो. संधी साधता आली नाही. ज्या गोळ्या घेऊन आम्ही आलो होतो, त्याचा वापर आम्ही केला नाही.

मॅक्युलम म्हणाला की, ऑस्ट्रेलियासारख्या संघाचा सामना करण्यासाठी न्यूझीलंडने अधिक आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. त्याने मार्टिन गप्टिलचा विशेष उल्लेख केला. गप्टिल आवश्यक तशी सुरुवात करु शकला नाही. मॅक्युलम म्हणाला, मला गप्टिलकडून आक्रमक खेळीची अपेक्षा होती. अंतिम सामन्यात त्याने ३५ चेंडूत २८ धावा केल्या. हे फारसं समाधानकारक नाही.