Brett Lee On Vaibhav Sooryavanshi Age Controversy: अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने क्रिकेट जगताला आपल्या स्फोटक फलंदाजीने भुरळ घातली आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंचं लक्ष वेधून घेतलं आहे. २०२६ च्या आयपीएलमधील (IPL) उत्कृष्ट कामगिरीनंतर, वैभवने भारतीय टी-२० संघात स्थान मिळवलं. इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी, झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याने निर्भयपणे खेळत दोन अर्धशतकं झळकावली आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार पटकावला. दरम्यान वैभव सूर्यवंशीच्या वयाबाबत पुन्हा एकदा माजी खेळाडूने केलेल्या वक्तव्याने चर्चा सुरू झाली आहे.
१५ वर्षांचं वय असताना फलंदाजीचा दृष्टिकोन आणि परिपक्वता पाहून प्रत्येकजण थक्क होतो; परिणामी, त्याच्या वयाबाबत वारंवार चर्चा रंगतात. आता, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने या विषयावर आपलं स्पष्ट मत मांडलं असून, वैभवच्या वयापेक्षा त्याची क्रिकेटमधील क्षमता अधिक महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे.
ब्रेट ली वैभव सूर्यवंशीबाबत नेमकं काय म्हणाला?
वैभवच्या वयाबाबत सुरू असलेल्या वादावर चर्चा करत बसण्याऐवजी, ब्रेट लीने या युवा फलंदाजाच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. ‘बिअर बायसेप्स’ (Beer Biceps) या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “तो अप्रतिम आहे. भारताबाहेरील जगाच्या अनेक भागांत लोक तोच प्रश्न विचारतात: तो खरोखरच १५ वर्षांचा आहे का? कदाचित सध्या जागतिक स्तरावर हाच सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय असावा.”
“त्याचं वय किती आहे, याने मला काहीच फरक पडत नाही. तो १५ वर्षांचा असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे, पण तो १७ किंवा १८ वर्षांचा असला तरी कोणाला काय फरक पडतो? हा मुलगा क्रिकेट खेळू शकतो. भारतासाठी भविष्यात तो मोठी कामगिरी करेल.”
वैभवच्या फलंदाजीचं कौतुक करताना ब्रेट ली ने नमूद केलं की, या युवा खेळाडूने अत्यंत कमी कालावधीत आयपीएलमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ब्रेट ली ला विशेषतः सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वैभवने खेळलेली ९७ धावांची खेळी आठवते. तो म्हणाला, “त्याने इतक्या कमी वेळात आयपीएलमध्ये आपली छाप पाडली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धची त्याची ९७ धावांची खेळी अप्रतिम होती.”
ब्रेट ली पुढे म्हणाला, “हुक किंवा पुल शॉट्स उत्तमरीत्या खेळणाऱ्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना मला मजा यायची, कारण त्यामुळे ती लढत रंजक बनायची. मी एक रणनिती तयार करायचो, त्याला ‘शॉर्ट बॉल’ टाकायचो आणि तो त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे पाहायचो. कदाचित तो माझ्या गोलंदाजीवर षटकारही ठोकायचा, पण तरीही त्याला तशाच प्रकारचे चेंडू टाकण्यापासून मी स्वतःला थांबवत नसे.”
आयपीएल २०२६ मध्ये वैभवने आपल्या आक्रमक खेळण्याच्या शैलीने सर्वांना प्रभावित केलं. आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या नामांकित गोलंदाजांच्या चेंडूंवर त्याने एखाद्या व्हिडिओ गेममधील खेळाडूंप्रमाणे सहजतेने षटकार ठोकले. त्याच्या बॅटचा वेग आणि विविध प्रकारचे फटके मारण्याची त्याची क्षमता यामुळे त्याचा आता चाहता वर्ग तयार झाला आहे. आयपीएलमधील या कामगिरीनंतर त्याला भारतीय टी-२० संघात स्थान मिळालं. इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला विशेष प्रभाव पाडता आला नाही, परंतु झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याने दमदार कामगिरी केली. वयाच्या १५ व्या वर्षी दोन आंतरराष्ट्रीय अर्धशतकं झळकावणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला.
