शारजात सुरू झालेला झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना पाहुण्या संघासाठी अनेकदृष्टीने अनोखा आहे. नियमित कर्णधार रिचर्ड नकाराग्वा दुखापतग्रस्त असल्याने निवडसमितीने २२वर्षीय ब्रायन बेनेटकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. ब्रायनचा स्वत:चा फॉर्म फारसा बरा नाहीये. चांगली कामगिरी करत संघासमोर चांगलं उदाहरण ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
ब्रायनच्या संघात ४०वर्षीय फिरकीपटू ग्रीम क्रीमरचं पुनरागमन होत आहे. क्रीमरने झिम्बाब्वेसाठी शेवटचा कसोटी सामना २०१७मध्ये खेळला होता. क्रीमरचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरणार आहे. झिम्बाब्वेसाठी १९ कसोटीत त्याने ५७ विकेट्स पटकावल्या आहेत. प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन करताना क्रीमरने मिड वेस्ट ऱ्हिनोज संघासाठी ९ विकेट्स पटकावल्या होत्या.
झिम्बाब्वेने या सामन्यात अँटूम नक्वीला पदार्पणाची संधी देण्याचा निर्णय घेतला. बेल्जियममध्ये जन्मलेल्या नक्वीने झिम्बाब्वेतल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. नक्वीने पहिल्या दोन फर्स्टक्लास सामन्यात शतकी खेळी केली होती. झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये ३०० धावांची खेळी करणारा नक्वी पहिलाच खेळाडू ठरला. २०२३ पासून नक्वी झिम्बाब्वेत खेळतो आहे. झिम्बाब्वेकडून खेळण्यासाठी आयसीसीने जारी केलेल्या नियमांची पूर्तता नक्वीने केली आहे. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये ६०च्या सरासरीने धावा करणाऱ्या नक्वीकडून झिम्बाब्वेला मोठ्या अपेक्षा आहेत. नक्वी पाकिस्तानी वंशाचा असून तो ऑस्ट्रेलियातही राहिला आहे. २०२४ मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेसाठी नक्वीचा विचार झाला होता. मात्र त्यावेळी तांत्रिक नियमांमुळे त्याला खेळता आलं नाही. त्याचं पदार्पण लाल फितीच्या कारभारात अडकलं आहे. मात्र आता सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्याने नक्वीने पदार्पण केलं आहे.
या संघात ४० वर्षीय ब्रेंडन टेलर आणि ४१वर्षीय क्रेग अर्व्हाइन हे माजी कर्णधारही आहेत. मात्र कर्णधारपदासाठी निवडसमितीने त्यांचा विचार केला नाही. या दौऱ्यात झालेल्या तिरंगी मालिकेत अफगाणिस्तानने बाजी मारली. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा ३-० असा धुव्वा उडवला.
