Brij Bhushan Sharan Singh Acquittal News: दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात माजी भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी माजी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह तसेच सहआरोपी विनोद तोमर यांची महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

हे प्रकरण दिल्लीच्या जंतर-मंतर येथे महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर समोर आलं होतं. बृजभूषण शरण सिंह हे WFI अध्यक्ष असताना त्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर १५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी सुमारे १,५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं.

या प्रकरणात भारतातील तसेच परदेशातील महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या आरोपांप्रकरणी बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांच्यावर न्यायालयीन खटला सुरू होता. मात्र, आता राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने दोघांनाही या प्रकरणात निर्दोष मुक्त केलं आहे. न्यायालयात प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांच्या वकिलांनी ही “सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता (Honourable Acquittal)” असल्याचं सांगितलं.

या प्रकरणामुळे विरोधकांकडून टीका होत असताना आणि राजकीय परिणामांची शक्यता लक्षात घेऊन भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून बृजभूषण शरण सिंह यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्याऐवजी पक्षाने त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी त्या मतदारसंघातून विजय मिळवला.