Brij Bhushan Sharan Singh Court Verdict News: दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी (३ ऑगस्ट) भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कायदेशीर लढ्यांपैकी एका प्रकरणात हा महत्त्वाचा निकाल मानला जात आहे.

हे प्रकरण कुस्तीपटू विनेश फोगटने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. विनेश फोगाट यांच्यासह सहा महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह हे WFI चे अध्यक्ष असताना त्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. मात्र, बृजभूषण शरण सिंह यांनी सुरुवातीपासूनच हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या आरोपांनंतर २०२३ मध्ये देशभरात मोठं आंदोलन उभं राहिलं. ऑलिम्पिक पदकविजेत्या आणि आघाडीच्या कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक महिने आंदोलन करत बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची आणि त्यांना WFI पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत राहिलं. नव्या संसद भवनाकडे मोर्चा काढताना दिल्ली पोलिसांनी अनेक कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं होतं. या कारवाईवर जगभरातील विविध क्रीडा संघटनांनी टीका केली होती. त्यानंतर आता बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता केल्याने विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान स्वत: बृजभूषण सिंह यांनी निर्दोष मुक्त केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.

बृजभूषण शरण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

बृजभूषण सिंग निर्दोष मुक्तता केल्यानंतर म्हणाले, “कोर्टात मला जज साहेबांनी आतमध्ये असं सांगितलं की, बृजभूषण सिंग आणि विनोद तोमर आपल्या दोघांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सन्मानपूर्वक हा शब्द त्यांनी वापरला. माझी यावर अशी प्रतिक्रिया आहे, पहिल्या दिवशी माझ्या वक्तव्यात मी म्हटलं होतं की माझ्यावरचा कोणताही आरोप जेव्हा सिद्ध होईल तेव्हा मी स्वत: फासावर चढेन. आज कोर्टाने सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली, मला याचा आनंद आहे. माझ्या समर्थकांसाठी आनंदाची बाब आहे. माझ्या वकिल साहेबांचे खूप खूप आभार. याहून जास्त आता काही बोलत नाही.”

तुमच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना काय सांगाल, असं विचारताच बृजभूषण सिंग म्हणाले, “मी जे सुरूवातीला म्हटलं होतं आरोप सिद्ध झाले तर फासावर चढेन, बस्स… आज आनंदाचा दिवस आहे.”