Brij Bhushan Singh on Vinesh Phogat WFI Row: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी मंगळवारी कुस्तीपटू विनेश फोगाटच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली. विनेशने सोमवारी आरोप केला होता की भारतीय कुस्ती महासंघाकडून तिला महिला फ्रीस्टाईल प्रकारात स्पर्धा खेळण्याची परवानगी देण्यात आली नाही. २०२३ मध्ये विनेशसह सहा महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. मात्र, या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना बृजभूषण म्हणाले की, “सोमवारी विनेशने मांडलेला विषय आता माझ्याशी संबंधित नाही.”
“मॅडमने जो गोंधळ घालून गेल्या आहेत, तो सध्या मी साफ करत आहे. तसेच, कुस्तीची स्पर्धा कुठे होणार किंवा होणार नाही, हा विषय आता माझ्या अधिकारक्षेत्रात येत नाही. हा निर्णय पूर्णपणे सध्याच्या भारतीय कुस्ती महासंघाचा आहे. स्पर्धा कुठे आयोजित करायची, कोण खेळणार आणि कोण नाही, हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे,” असं बृजभूषण शरण सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
पुढे म्हणाले, “मी अनेक वर्षे महासंघाचा अध्यक्ष होतो. त्या अनुभवावरून एवढंच सांगू शकतो की महासंघ कधीही कोणत्याही खेळाडूला विनाकारण खेळण्यापासून रोखत नाही, कारण महासंघ हा खेळाडूंसाठीच असतो. जर एखाद्या खेळाडूला थांबवण्यात आलं असेल, तर त्यामागे काही कारण नक्कीच असेल आणि ते कारण संबंधित खेळाडूला सांगितलंही गेलं असेल.”
दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाने विनेश फोगाटला डोपिंगविरोधी नियमांचं उल्लंघन आणि शिस्तभंगाचे आरोप करत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच तिला २६ जूनपर्यंत स्पर्धांमधून बंदी घालण्यात आली आहे. या नोटिसनंतर अवघ्या दोन दिवसांनी विनेश गोंडा येथे आयोजित राष्ट्रीय ओपन रँकिंग स्पर्धेसाठी पोहोचली. विशेष म्हणजे, एप्रिलच्या अखेरीसच तिने या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती.
पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशेनंतर तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या विनेश फोगाटला भारतीय कुस्ती महासंघाकडून सविस्तर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महासंघाने तिच्यावर शिस्तभंग आणि डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप केले असून, २६ जूनपर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास अपात्र ठरवलं आहे. महिला फ्रीस्टाईल प्रकारासाठी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विनेश गोंडा येथे पोहोचली होती. मात्र, महासंघाने तिला आधी शनिवारी पाठवलेल्या नोटिसला सविस्तर उत्तर देण्यास सांगितलं.
भारतीय कुस्ती महासंघाच्या मते, निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना यूडब्ल्यूडब्ल्यूच्या डोपिंगविरोधी नियमांनुसार अनिवार्य सहा महिन्यांची नोटीस कालावधी पूर्ण करावा लागतो. ३१ वर्षीय विनेशने ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा दावा महासंघाने केला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना स्पष्ट केलं की, खेळाडू कितीही मोठा असला तरी नियमांमध्ये सवलत दिली जाऊ शकत नाही. “विनेशला स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी असल्यामुळे तिने येथे येण्याचं काही कारण नव्हतं. मात्र, ती गोंडाला आल्यानंतर महासंघाने तिला कारणे दाखवा नोटीस का बजावण्यात आली, याची सविस्तर माहिती दिली. त्यावर तिने मला सांगितलं की ती याबाबत सविस्तर उत्तर देणार आहे,” असं संजय सिंह म्हणाले.
संजय सिंह पुढे म्हणाले, “एकदा तिचं उत्तर आल्यानंतर महासंघाची शिस्तपालन समिती दहा दिवसांच्या आत निर्णय घेईल. मात्र, महिला कुस्तीपटूंसाठी आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निवड चाचण्या ३० मे रोजी आहेत. तोपर्यंत ती उत्तर देईल का आणि समितीकडे तिच्या सहभागाबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ असेल का? मला तसं वाटत नाही.”
