रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा, भारताच्या या फिरकी जोडगोळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकांना आपल्या तालावर नाचवलं आहे. मात्र काही वर्षांपासून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या मनगटी फिरकीपटूंच्या आगमनानंतर दोन्ही खेळाडू मागे पडले आहेत. रविंद्र जाडेजा अष्टपैलू म्हणून वन-डे आणि टी-२० संघात येऊन-जाऊन असतो, मात्र रविचंद्रन आश्विनला आपल्या वन-डे आणि टी-२० संघातल्या स्थानावर पाणी सोडावं लागलं आहे. मात्र आश्विनला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची एक संधी मिळाली पाहिजे अशी मागणी भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने केली आहे.

अवश्य वाचा – विंडीज दौऱ्यात भारताच्या ‘हिटमॅन’ला विश्रांती मिळण्याची शक्यता !

“जर वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये तुम्ही फिरकीपटूकडून सामन्याची सुरुवात करणार असाल (वॉशिंग्टन सुंदरने गेल्या काही मालिकांमध्ये टी-२० सामन्यात पहिलं षटक टाकलं आहे) तर संघात एखादा हक्काने बळी घेणारे गोलंदाज असायला काय हरकत आहे? आश्विन सध्या चांगली कामगिरी करतोय, कसोटी क्रिकेटमध्येही त्याने चांगला खेळ केलाय. त्याला एकदा संधी मिळण्यास काय हरकत आहे?” हरभजन सिंह ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

अवश्य वाचा – BCCI निवड समितीत बदलांचे संकेत, ‘या’ माजी खेळाडूकडे सूत्र जाण्याची शक्यता

आश्विन चेंडू चांगला वळवतो, त्याच्या गोलंदाजीत वैविध्य आहे. वॉशिंग्टन सुंदरला अजुन बऱ्याच गोष्टी शिकण्याची गरज आहे. त्याने चांगली कामगिरी करावी अशीच माझी इच्छा आहे. मात्र नवोदीत फिरकीपटूंनीही आपण संघात कोणाची जागा घेणार आहोत, या सर्व गोष्टींचा विचार करुन स्वतःत सुधारणा करायला हवी, हरभजन आश्विनच्या गोलंदाजीवर बोलत होता. सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून, २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे.