scorecardresearch

बुमरा तंदुरुस्त; पण संघाबाहेरच!

प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा तंदुरुस्त झाला असला, तरी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी त्याला भारतीय संघात स्थान देणे निवड समितीने टाळले आहे. 

बुमरा तंदुरुस्त; पण संघाबाहेरच!

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने धोका पत्करणे टाळले

वृत्तसंस्था, मुंबई : प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा तंदुरुस्त झाला असला, तरी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी त्याला भारतीय संघात स्थान देणे निवड समितीने टाळले आहे. सप्टेंबर महिन्यात बुमराच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसला. या दोन्ही स्पर्धामध्ये भारताला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, पण भारताला अपेक्षित यश मिळाले नाही.

बुमरा गेल्या काही काळापासून बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार घेत असून गोलंदाजीचा सराव करतो आहे. मात्र, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे महत्त्व लक्षात घेऊन निवड समितीने बुमराबाबत धोका पत्करणे टाळले आहे. बुमराला आता सरावादरम्यान एखाद्या सामन्याप्रमाणे गोलंदाजी करण्यास सांगण्यात येणार आहे. यादरम्यान, त्याचा जास्तीतजास्त षटके टाकण्याचा प्रयत्न असेल. त्याला गोलंदाजी करताना कोणताही त्रास न जाणवल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार असल्याचे समजते.

२९ वर्षीय बुमराने सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेन्टी-२० सामने खेळले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेपूर्वी सरावादरम्यान बुमराच्या पाठीला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला सहा महिने मैदानाबाहेर राहावे लागू शकेल असे म्हटले जात होते. परंतु, तीन महिन्यांच्या कालावधीतच तो पुन्हा तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे.

अर्शदीपला ‘आयसीसी’च्या उदयोन्मुख क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन

दुबई : भारताचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्षांतील सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारासाठी अर्शदीपसह दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन, न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अ‍ॅलन आणि अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहिम झादरान हे शर्यतीत आहेत. या पुरस्कारासाठी मतदानाची प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू होणार असल्याचे ‘आयसीसी’कडून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सहा महिन्यांतच अर्शदीपला ‘आयसीसी’च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळवण्यात यश आले. २३ वर्षीय अर्शदीपने जुलै महिन्यात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २१ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांत त्याने १८.१२च्या सरासरीने ३३ गडी बाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या