पीटीआय, नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आता तीन आठवडय़ांहूनही कमी कालावधी शिल्लक असून त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकण्याची दाट शक्यता आहे.

‘‘बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे. या दुखापतीमुळे त्याला जवळपास सहा महिने मैदानाबाहेर राहावे लागू शकेल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. परंतु ‘बीसीसीआय’ने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

पाठीच्या दुखापतीमुळेच बुमराला या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागले होते. बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर बुमराला ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त घोषित केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. तो या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळला. मात्र, बुधवारी तिरुवनंतपूरम येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात बुमरा खेळू शकला नाही. ‘‘बुमराने मंगळवारी भारताच्या सराव सत्रादरम्यान पाठदुखीची तक्रार केली. त्याला ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे,’’ असे पहिल्या सामन्यापूर्वी ‘बीसीसीआय’ने ट्वीट करून सांगितले होते.

बुमरापूर्वी भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाही दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. ‘‘बुमरा आणि जडेजा हे दोन अनुभवी खेळाडू ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. बुमराला जास्त ताण जाणवू नये यासाठी आम्ही खबरदारी घेतली होती. त्याला आशिया चषकात खेळवणे आम्ही टाळले होते. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठीही तंदुरुस्त होता का, असा आता प्रश्न निर्माण झाला आहे,’’ असेही ‘बीसीसीआय’चा अधिकारी म्हणाला. 

शमी, चहर की सिराज?

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात निवड झाली आहे. आता बुमरा या स्पर्धेला मुकणार असल्याने या दोघांपैकी एकाला मुख्य संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय संघ मोहम्मद सिराजबाबतही विचार करू शकेल असे म्हटले जात आहे. 

शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही!

बुमरावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसली, तरी त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. २०२२ वर्षांत बुमराने ‘आयपीएल’मध्ये सर्व १४ साखळी सामने खेळले. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो केवळ पाच कसोटी, पाच एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे. ‘‘या वर्षभरात बुमराने फारसे सामने खेळलेले नाहीत. त्याला आशिया चषक, वेस्ट इंडिज दौरा आणि भारतात झालेल्या काही द्विदेशीय मालिकांसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’चा अधिकारी म्हणाला.  आता बुमरा दुखापतीवर उपचार घेण्यासाठी पुन्हा ‘एनसीए’मध्ये दाखल होईल. त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागू शकेल, असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.