नियमित कर्णधार मायकेल क्लार्क दुखापतग्रस्त असल्याने ब्रॅड हॅडिन कर्णधारपदाची जबाबदारी पेलणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच दुखापती आणि ढासळत्या फॉर्ममुळे हॅडिन निवृत्तीचा विचार करत होता. परंतु हे सगळे विचार बाजूला सारून तो नव्या ऊर्जेने मैदानात उतरला. शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा थकवा जाणवत असल्याने क्रिकेटला अलविदा करण्याचा विचार मनात डोकावला असे हॅडिन ‘डेली टेलिग्राफ’ला सांगितले.
या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हॅडिनने रग्बीपटू टॉम कार्टरची मदत घेतली. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर हॅडिनने माझ्याशी संवाद साधला. प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेनंतर तो खूप दमला होता. पुढे काय करायचे, याविषयी त्याचा गोंधळ उडाला होता. मग एका महिन्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. कोणताही निर्णय गोंधळाच्या स्थितीत घेऊ नकोस असा सल्ला दिला,’’ असे कार्टर यांनी सांगितले.