लक्ष्य, सात्त्विक-चिरागच्या कामगिरीकडे लक्ष

बाली : ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्याला बुधवारपासून प्रारंभ होत असून, या स्पर्धेत भारताच्या अभियानाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूकडे आहे. याशिवाय लक्ष्य सेन तसेच पुरुष दुहेरीतील आशास्थान सात्त्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक सात खेळाडू वर्षांअखेरच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. परंतु या स्पर्धेत २०१८मध्ये जेतेपद मिळवण्याची किमया साधणारी एकमेव भारतीय खेळाडू सिंधू उपांत्य फेरीचा अडथळा पार करून प्रतिष्ठेचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असेल. अ-गटात समावेश असलेल्या सिंधूची पहिली लढत अग्रमानांकन लाभलेल्या थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगशी होणार आहे. श्रीकांतने २०१४मध्ये या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्याची सलामी मलेशियाच्या द्वितीय मानांकित ली झि जियाशी होणार आहे. पदार्पणवीर लक्ष्य आणि सात्त्विक-चिराग यांना खडतर गटाचे आव्हान आहे. अ-गटात लक्ष्यला ऑलिम्पिक विजेता व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन, दोन वेळा विश्वविजेता केंटो मोमोटा, रॅसमस गेमके यांना सामोरे जावे लागेल.