भारताचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील याने शुक्रवारी ISSF (आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला. जागतिक चॅम्पियनशिपच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत महान अभिनव बिंद्रानंतर ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय नेमबाज ठरला आहे. २०२४ ऑलिम्पिक कोटा मिळवणारा तो दुसरा भारतीय नेमबाज आहे.

अठरा वर्षीय रुद्राक्षने सुवर्णपदकाचा सामना गमावल्यानंतर पुनरागमन करत इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा १७-१३ असा पराभव केला. यंदाच्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिकसाठी चार कोटा जागा उपलब्ध आहेत. भारताने नुकताच क्रोएशियातील शॉटगन जागतिक नेमबाजी स्पर्धेमधील पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत भावनीश मेंदिरट्टाच्या माध्यमातून पहिला कोटा मिळवला. प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेला रुद्राक्ष एका वेळी अव्वल दोन खेळाडूंचा निर्णय घेण्यासाठी नव्या फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या सुवर्णपदकाच्या सामन्यात ४-१० ने पिछाडीवर होता. इटालियन नेमबाजाने बहुतांश सामन्यात आपली आघाडी कायम ठेवली पण भारतीय नेमबाजाने शानदार पुनरागमन केले.

हेही वाचा :   सोशल मीडियावर #ArrestKohli ट्रेंडिंग होण्यामागचे नक्की कारण काय, जाणून घ्या

रुद्राक्षने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले आणि रँकिंग फेरीत दुसरे स्थान मिळवून सुवर्णपदकाच्या सामन्यात प्रवेश करून ऑलिम्पिक कोटा मिळवला. यापूर्वी बीजिंग ऑलिम्पिक (२००८) सुवर्णपदक विजेत्या बिंद्राने २००६ मध्ये झाग्रेब येथे १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा :  Women’s T20 Asia Cup 2022: स्मृती मंधानाचा षटकार अन् लंका’हरण’; भारतीय महिलांनी जिंकला आशिया चषक 

२५ मीटर पिस्तूल ज्युनियर संघाने सुवर्णपदक पटकावले

भारताने गुरुवारी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक कनिष्ठ गटात कांस्यपदक जिंकून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. ईशा सिंग, नाम्या कपूर आणि विभूती भाटिया या त्रिकुटाने कांस्यपदकाच्या लढतीत जर्मन संघाचा १७-१ असा पराभव करून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदकतालिकेत भारताचे नाव कोरले.