इंडियन प्रिमियर लीगचा (आयपीएल) थरार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. गुणतालिकेतील अव्वल चार संघ आता अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी एकमेकांसोबत दोन हात करताना दिसतील. पाचवेळा विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम सर्वात वाईट ठरला. आपल्या एकूण 14 साखळी सामन्यातील 10 सामने गमावल्यामुळं मुंबई इंडियन्स गुणतालिकेच्या सर्वात तळाला रहावे लागले आहे. स्पर्धेतील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आल्याने मुंबईच्या खेळाडूंनी आता आपापल्या घरचा रस्ता धरला आहे. हळूहळू एक-एकजण बायोबबलमधून बाहेर पडत आहे. या दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची एक कृती जास्त चर्चेत आली आहे. रोहित शर्मानं बायोबबलमधून बाहेर पडणाऱ्या रमणदीप सिंगला निरोप देताना मदतीचं आश्वासन दिले आहे. त्याच्या या कृतीचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

एक कर्णधार म्हणून आयपीएलचा पंधरावा हंगाम रोहितसाठी वाईट तर ठरलाच शिवाय एक खेळाडू म्हणूनही तो चांगली कामगिरी करू शकला नाही. संघाचा कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. असे असले तरी तो आपल्या संघातील खेळाडूंच्या कायम पाठीशी उभा असल्याचे दिसते. ही गोष्ट मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडलवरील एक व्हिडिओतून सिद्ध होते. मुंबईने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सर्व खेळाडू घराकडे परतताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि संघातील अष्टपैलू खेळाडू रमणदीप सिंग यांचा काही सेकंदांचा संवादही दाखवण्यात आला आहे. या संवादादरम्यान, कर्णधार रोहित शर्मा रमणदीपला संपर्कात राहण्यास सांगतो आहे. शिवाय त्याला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज पडली तर लगेच फोन करण्यास सांगतो आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी रोहित शर्माच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

मूळचा चंडीगडचा असलेला रमणदीप सिंग हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएल २०२२ च्या लिलावामध्ये त्याला मुंबई इंडियन्सनं २० लाख रुपये किंमत देऊन खरेदी केले होते. तेव्हापासून तो मुंबईच्या संघामध्ये आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये त्याला चार सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने चार बळी घेत ३४ धावांचे योगदान दिले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३० धावांत तीन बळी, ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.