२०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान बॉल टेम्परिंगच्या घटनेबाबत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरून बॅनक्रॉफ्टने धक्कादायक खुलासा केला आहे. बॉल टेम्परिंगची माहिती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आधीच होती, असे बॅनक्रॉफ्टने सांगितले. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली होती, तर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली होती.

 

बॅनक्रॉफ्ट म्हणाला, “हो. साहजिकच मी जे केले त्याचा गोलंदाजांना फायदा झाला. गोलंदाज याबद्दल आधीच माहीत होते. मला वाटते, की मी स्वतः काय केले, याची जबाबदारी मला घ्यायची होती. गोलंदाजांना फायदा झाला आणि त्यांनाही हे कदाचित माहित असावे. मला एक गोष्ट शिकायला मिळाली आहे, की जर मी अधिक जागरूक झालो असतो तर मी आणखी चांगले निर्णय घेतले असते.”

बॅनक्रॉफ्टने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ४४६ धावा केल्या आहेत. केपटाऊन कसोटीदरम्यान बॉल टेम्परिंगनंतर बॅनक्रॉफ्ट टीकेचा धनी ठरला होता. तो म्हणाला, “मी खूप निराश होतो कारण मी संघाला निराश केले. परंतु जेव्हा मी त्या पातळीवर खरोखर सुधारत होतो, तेव्हा असे घडले.”

बॉल टेम्परिंगची घटना

२०१८च्या मार्चमध्ये केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली होती. या मलिकेच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान टीव्हीवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला सँडपेपरचा पिवळा तुकडा लपवताना पाहण्यात आले होते. याच दिवशी संध्याकाळी स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टने यासंबंधी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुद्दाम चेंडूंशी छेडछाड केल्याचे कबूल केले होते. मात्र, नंतर या प्रकरणात वॉर्नरही दोषी असल्याचे समजले होते.