IPL 2026 Cameron Green Inning: कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक पैसे खर्चून विकत घेतलेल्या कॅमेरून ग्रीनला अखेर सूर गवसला. स्पर्धेतील आपला विजय मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या केकेआर संघासाठी कॅमेरून ग्रीनने एकट्याने कडवी झुंज दिली. कॅमेरून ग्रीनच्या खेळीच्या बळावर केकेआने प्रथम फलंदाजी करताना १८० धावांचा पल्ला गाठला. ट्रोल होत असलेल्या ग्रीनने एकाच खेळीच्या बळावर सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकत गुजरातविरूद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण केकेआरचीस सुरूवात खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्यानंतर टीम सेफर्ट १९ धावांवर माघारी परतला. यानंतर अंगक्रिश रघुवंशी ८ धावांवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्रीनने एकट्याने संघाचा डाव सावरला.
कॅमेरून ग्रीनला रोव्हमन पॉवेल काही वेळ चांगली साथ दिली. ग्रीन व पॉवेलने मिळून चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचली. कॅमेरून ग्रीनवर आतापर्यंतच्या खराब कामगिरीमुळे सातत्याने टीका होत आहे, विशेषतः केकेआरने मिनी-लिलावात त्याच्यासाठी २५ कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात घेतल्याने अपेक्षित कामगिरी तो करत नसल्याने टीकेचा जोर वाढला होता. पण, त्याने गुजरातविरुद्ध ७९ धावा करून संघाला एक सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली. त्याने सर्वप्रथम २७ धावांचं योगदान देणाऱ्या रोव्हमन पॉवेलसोबत ५५ धावांची भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढलं.
तिथून पुढे ग्रीनने एकहाती संघाचा डाव पुढे नेत धुमाकूळ घातला. एकावेळी तो ३१ चेंडूंमध्ये ३७ धावांवर खेळत होता. त्याने आपल्या डावाच्या पुढच्या २४ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. त्याने अनुकूल रॉयसोबत ६० धावांची भागीदारी केली, पण त्या भागीदारीत सर्वाधिक धावांचं योगदान ग्रीनचं होतं. ग्रीनने सामन्यात ५५ चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली.
गुजरात टायटन्सकडून पाच गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि प्रत्येकाने किमान एक बळी घेतला. विशेषतः कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मिळून सहा फलंदाजांना बाद करून कोलकाताची धावगती नियंत्रणात ठेवली. तरूण वेगवान गोलंदाज अशोक शर्मा महागडा ठरला, पण त्याने तरीही दोन बळी घेतले. रशीद खानलाही एक बळी घेण्यात यश आलं.
