IPL 2026 Cameron Green Flop show: कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आजचा सामना खेळवला जात आहे. पण पावसामुळे ३.४ षटकं झाल्यानंतर सामना थांबवण्यात आला आहे. या सामन्याची नाणेफेक केकेआरने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पंजाबला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. पण अवघ्या ३.४ षटकांतच केकेआरला दोन धक्के बसले असून २५ कोटींना संघात सामील केलेला कॅमेरून ग्रीन ४ धावा करत स्वस्तात बाद झाला.

केकेआरने सलग दोन सामन्यांमध्ये पराभूत झाल्याने संघाची सुरूवात फारच खराब झाली आहे. यानंतर तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सविरूद्धही संघाची सुरूवात वाईट झाली. ३ षटकांत सावध सुरूवात केल्यानंतर चौथ्या षटकात आलेल्या झेवियर बार्टलेटने आधी फिन एलेनला झेलबाद केलं आणि षटकातील अखेरच्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनदेखील झेलबाद झाला.

कॅमेरून ग्रीनला केकेआर संघाने आयपीएल लिलावात तब्बल २५.२० कोटींना संघात सामील केलं. पण आता सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये तो फेल ठरला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाकडून त्याला अद्याप गोलंदाजीसाठी हिरवा कंदील देण्यात आलेला नाही. ग्रीन ज्या प्रकारे खेळत आहे, त्यावरून असं दिसते की मिनी लिलावात केकेआरची पूर्णपणे फसवणूक झाली आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये २४ धावा केल्या आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) २५ कोटींची विक्रमी बोली लावून संघात घेतलेला कॅमेरून ग्रीन सध्या संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. सलग तीन सामन्यांमध्ये फलंदाजीमध्ये अपयशी ठरल्यामुळे ग्रीनच्या फॉर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्या फिनिशिंग रोलसाठी आणि मधल्या फळीला मजबुती देण्यासाठी त्याच्यावर मोठी गुंतवणूक करण्यात आली, तिथे तो अद्याप प्रभाव पाडू शकलेला नाही. ग्रीनच्या या खराब फॉर्ममुळे केकेआरच्या मधल्या फळीवरचा दबाव वाढला असून, मोक्याच्या क्षणी धावांची गती वाढवण्यात संघ अपयशी ठरत आहे. २५ कोटींसारखी मोठी रक्कम खर्च करूनही जर प्रमुख परदेशी खेळाडू धावा करत नसेल, तर ते संघाच्या एकूण संतुलनासाठी घातक ठरत आहे.

दुसरीकडे, ग्रीन अद्याप गोलंदाजी करत नसल्याने केकेआरच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. एक ‘ऑलराउंडर’ म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असताना, तो केवळ एक फलंदाज म्हणून खेळत असल्याने संघाला सहाव्या गोलंदाजाचा पर्याय मिळत नाहीये. यामुळे कर्णधाराला गोलंदाजीमध्ये बदल करताना मर्यादा येत आहेत आणि मुख्य गोलंदाजांवर अतिरिक्त ताण पडत आहे. २५ कोटींचा खेळाडू जर गोलंदाजी करणार नसेल आणि फलंदाजीतही अपयशी ठरेल, तर त्याचा फटका संघाच्या गुणतालिकेतील स्थानावर होऊ शकतो. ग्रीनची ही कामगिरी अशीच राहिली तर केकेआरला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून इतर पर्यायांचा विचार करावा लागेल.

कॅमेरून ग्रीनला चाहत्यांनी तुफान ट्रोल केलं आहे. केकेआरची 25 कोटींना ग्रीनने फसवणूक केल्याचं चाहते स्पष्ट म्हणत आहेत. याचबरोबर तो बॉलिंग करत नसल्याने त्याच्यावरील टीका अधिक तीव्र होत चालली आहे.