Cameron Green Run out: आयपीएल २०२६ स्पर्धेतील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २२६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला १६१ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाने ६५ धावांनी आपल्या नावावर केला. यादरम्यान कॅमेरुन ग्रीन ज्या पद्धतीने बाद झाला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

असं कोण आऊट होतं?

कॅमेरुन ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्स संघाने २५ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे. पण तो सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. पहिल्या सामन्यात संघाला गरज असताना तो गोलंदाजी करू शकला नव्हता. आता हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोलकाताला धावांची गरज होती. पण तो निष्काळजीपणे धावला आणि विकेट फेकून मैदानाबाहेर गेला.

तर झाले असे की, पावरप्लेमधील शेवटचे षटक टाकण्यासाठी इशान मलिंगा गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर कॅमेरुन ग्रीनने फटका मारला. पण धाव घेत असताना, नॉन स्ट्रॉइकला असलेल्या अंगकृष रघुवंशी आणि इशान मलिंगा यांच्यात धडक झाली. पण रघुवंशीने वेगाने धावत १ धाव पूर्ण केली.

त्यानंतर सहाव्या चेंडूवर अंगकृष रघुवंशीने समोरच्या दिशेने फटका मारला. पण हा चेंडू इशान मलिंगाने पायाने थांबवला. चेंडू पायाला लागताच तिथेच थांबला. कॅमेरुन ग्रीनला धावायची काहीच गरज नव्हती. पण तो धावला आणि पुढे जाऊन थांबला. अंगकृष रघुवंशी देखील मध्येच थांबला. त्यामुळे यष्टी उडवताच अंगकृष रघुवंशीने पॅव्हेलियनची वाट धरली. पण अंपायरने त्याला थांबवलं आणि रिप्ले पाहिला, त्यावेळी कॅमेरुन ग्रीनला बाद घोषित केलं. कारण यष्टी उडवली तेव्हा त्याने मध्यरेषा पार केली नव्हती.

कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने ३५ धावा केल्या. सलामीला आलेल्या फिन ॲलेनने २८ धावा केल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव १६१ धावांवर आटोपला. यासह हैदराबादने हा सामना ६५ धावांनी आपल्या नावावर केला.