आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळवणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण एका खेळाडूने वयाच्या ३०व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २०२४ मध्ये या खेळाडूला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याला २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या, पण त्याला चांगलं पुनरागमन करता आलं नाह आणि आता वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याने व्यावसायिक क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं आहे.

सरे काउंटीचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन स्टीलला घोट्याच्या गंभीर दुखापतीमुळे व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त व्हावं लागलं आहे. २०२४ मध्ये स्टीलच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर, फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याच्यावर ब्रॉन्कोस्टोमिक रिपेअर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो मे २०२५ मध्ये मैदानावर परतला, परंतु त्याच दुखापतीमुळे त्याला सतत त्रास होऊ लागला.

या दुखापतीमुळे सप्टेंबर २०२५ मध्ये त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली, ज्यानंतर सहा महिन्यांची पुनर्वसन प्रक्रिया पार पडली. अखेरीस, वैद्यकीय सल्ल्यानुसार, त्याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना स्टील म्हणाला, “व्यावसायिक क्रिकेट खेळणं, विशेषतः सरेसाठी, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. मागचे १८ महिने अत्यंत निराशाजनक होते आणि वैद्यकीय कारणांमुळे निवृत्त होणं खूप दुःखदायक आहे. प्रत्येक कठीण काळात मला साथ दिल्याबद्दल आणि प्रत्येक अडथळा सहन केल्याबद्दल वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे, तसेच ज्यांच्या खांद्यांनी आणि पाठीने वर्षानुवर्षे थ्रोडाउन्सचा भार सहन केला, त्या प्रशिक्षकांचे मनःपूर्वक आभार.”

कॅमेरॉन स्टीलने एकूण १३२ व्यावसायिक सामने खेळले आहेत, ज्यात ६६ प्रथम-श्रेणी सामन्यांचा समावेश आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मिडलसेक्सच्या अकादमीमधून केली. डरहॅम विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो डरहॅम संघात सामील झाला, जिथे त्याने तरुण वयात द्विशतक झळकावून इतिहास रचला.

यानंतर तो २०२१ मध्ये सरे काउंटी संघात सामील झाला, जिथे त्याने खऱ्या अर्थाने आपलं स्थान निर्माण केलं. स्टील एक फलंदाज आणि लेग स्पिनर म्हणून उपयुक्त ठरला. सरे संघाला तीन काउंटी चॅम्पियनशिप विजेतेपद (२०२२, २०२३ आणि २०२४) मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ६६ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये २७३३ धावा केल्या आणि ६० बळी घेतले. लिस्ट ए मध्येही त्याच्या नावावर ६६६ धावा आणि ४५ बळी आहेत. त्याने २४ टी-२० सामने खेळून १६५ धावा केल्या आणि १२ बळी घेतले.