India vs Pakistan Scenario: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधी पाकिस्तानने भारतासोबत सामना खेळण्यास नकार दिला होता. पण स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला निर्णय बदलला. १५ फेब्रुवारीला कोलंबोत भारत – पाकिस्तान सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने ६१ धावांनी हरवलं. या विजयासह भारतीय संघाने सुपर ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. तर पाकिस्तानचं सुपर ८ फेरीचं समीकरण तळ्यात मळ्यात होतं. अखेर नामिबियाला हरवून पाकिस्ताननेही सुपर ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, भारत – पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार का? जाणून घ्या कसं असेल समीकरण?
आशिया चषक २०२५ स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ३ वेळा आमनेसामने आले होते. या सामन्यातील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती. टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतही भारत – पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात.
भारत – पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार?
साखळी फेरीत भारत – पाकिस्तान सामना पाहायला मिळाला होता. आता सुपर ८ फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यांचं वेळापत्रक आता समोर आलं आहे. ज्यात भारत – पाकिस्तानचा समावेश नसल्याचं दिसून येत आहे. यामागचं कारण असं की, सुपर ८ फेरीत प्रवेश करणारे संघ आपल्या विरोधी गटातील संघांचा सामना करतात. भारत – पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात असल्याने आमनेसामने येणार नाहीत. पण दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात.
कसं असेल समीकरण?
जर सेमीफायनलमध्ये भारत – पाकिस्तान सामना पाहायचा असेल तर, भारताने आपल्या गटातून अव्वल स्थानी राहायला हवं. तर पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असायला हवं. असं झाल्यास दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये आमनेसामने येऊ शकतात. सुपर ८ फेरीत ८ संघांना २ गटात विभागलं जातं. दोन्ही गटातील संघ आपल्या गटातील संघाचा सामना करतात. भारतीय संघ पहिल्या गटात आहे. तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या गटात आहे.
