Lucknow Super Giants Playoffs Scenario: लखनौ सुपर जायंट्स संघाला आयपीएल २०२६ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळताना लखनौ सुपर जायंट्स संघाला लागोपाठ पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तसेच हा लखनौच्या या हंगामातील सहावा पराभव ठरला. लखनौला ८ पैकी केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातील पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. दरम्यान या पराभवानंतरही लखनौचा संघ गुणतालिकेत प्रवेश करू शकतो का? जाणून घ्या कसं असेल समीकरण.

पहिलं समीकरण

लखनौ सुपर जायंट्सचा संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. त्यासाठी लखनौला पुढील सर्व ६ सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. असं झाल्यास लखनौचा संघ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. जर लखनौचा संघ १६ गुणांपर्यंत पोहोचला, तर स्वबळावर प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो.

दुसरं समीकरण

लखनौ सुपर जायंट्सचे आतापर्यंत जितके सामने शिल्लक आहेत, त्यापैकी केवळ १ सामन्यात पराभव झाला, तर लखनौचा प्लेऑफमध्ये जाण्यास मार्ग मोकळा असेल. कारण असं झाल्यास लखनौ सुपर जायंट्सचा संघ १४ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. यासाठी नेट रनरेट महत्वाचा ठरेल. तसेच इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.

तिसरं समीकरण

जर लखनौ सुपर जायंट्सने उर्वरीत सामन्यांपैकी २ सामने गमावले, तर लखनौचा संघ अधिकृतरित्या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यानंतर सर्व सामने जिंकूनही लखनौचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही. १२ गुणांसह प्लेऑफमध्ये गाठणं खूप कठीण आहे. कारण काही संघांनी ७ सामन्यांनंतरच १० गुण कमावले आहेत. आता लखनौचा संघ कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लखनौचा पराभव

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ गडी बाद १५५ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौने देखील १५५ धावा करून धावसंख्या बरोबरीत आणली. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाला केवळ १ धाव करता आली. यासह २ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला.