Can Mumbai Indians Still Qualify In Playoffs: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार रंगल. दुसऱ्या सामना रायपूरमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १६६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शेवटच्या चेंडूवर २ धावा घेऊन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दमदार विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून कृणाल पंड्याने दमदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी?

हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण सूर्या देखील मुंबईचं नशीब बदलू शकला नाही. मुंबईने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. त्यापैकी मुंबईला केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर उर्वरीत ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ६ गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे. जर मुंबईने पुढील तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले, तरीदेखील मुंबईचा संघ १२ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. हे गुण मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी पुरेसे नसतील. त्यामुळे मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. लखनौ सुपर जायंट्सनंतर मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे.

टॉप ४ मध्ये कोण?

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, आता ८ संघांमध्ये प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चुरशीची लढत रंगली आहे. मुंबईला हरवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ देखील १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. गुजरात टायटन्सने देखील १४ गुणांची कमाई केली आहे. पंजाब किंग्जचा संघ १३ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर १२ गुणांसह चेन्नईचा संघ पाचव्या स्थानी आहे आणि राजस्थान रॉयल्सचा संघ सहाव्या स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सातव्या स्थानी आणि दिल्लीचा संघ आठव्या स्थानी आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा २ गडी राखून विजय

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक ५७, तर नमन धीरने ४७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ७ गडी बाद १६६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर जेकब बेथेलने २७ धावांचे योगदान दिले. शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने २ गडी राखून विजय मिळवला.