एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे धोका लक्षात घेता सायप्रस येथे आठवड्यावर आलेल्या प्रतिष्ठेच्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनाविषयी शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत. अशावेळी एका जर्मन अब्जाधीशाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघास (फिडे) ही स्पर्धा जर्मनीत स्थानांतरित करण्याचा पर्याय सुचवला आहे. अर्थात, याला ‘फिडे’ने अजून प्रतिसाद दिलेला नाही.
‘‘गरज पडल्यास तात्काळ तोडगा काढण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी माहिती ‘फिडे’ला आधीच देण्यात आली आहे,’’ असे जर्मनीतील अब्जाधीश रोझेनस्टीन यांनी ‘एक्स’ वर लिहिले. आवश्यक असल्यास, आम्ही त्वरित कृती करण्यास तयार आहोत. आम्ही जर्मनीमध्ये कँडिडेट्स स्पर्धेचे आयोजन करू शकतो, ज्यामुळे सर्व सहभागी आणि अधिकार्यांसाठी जास्तीत जास्त सुरक्षा आणि विश्वासार्हता सुनिश्चित होईल,’’ असेही त्यांनी पुढे लिहिले आहे.
लेबनॉनमधून सोडण्यात आलेल्या ड्रोनने बेटावरील ब्रिटिश हवाई दलाच्या तळावर हल्ला करण्यात आला, तेव्हाच सायप्रसमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात धोका असल्याचे स्पष्ट झाले होते. हल्ला करण्यात आलेले ठिकाण स्पर्धा होणार असलेल्या ‘कॅप सेंट जॉर्ज हॉटेल अँड रिसॉर्ट’ पासून ८५ किमी पूर्वेला आहे. या घटनेनंतरच महिला विभागातील अव्वल स्पर्धक भारतीय कोनेरू हम्पी हिने स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. अर्थात, स्पर्धेत सहभागी होणार्या पुरुष, महिला मिळून एकूण सोळा बुद्धिबळपटूंपैकी केवळ हम्पी हिनेच सुरक्षिततेच्या कारणावरून माघारीचे वक्तव्य केले आहे.
यानंतर ‘फिडे’ने स्पर्धा वेळापत्रकानुसार पार पडेल आणि ते दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. ‘‘शेवटी, तुम्ही शांततापूर्ण आणि चांगल्या वातावरणात खेळण्याच्या स्थितीत असायला हवे. बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र सायरनने वेढलेले असताना एकाग्रता लाभणे कठीण आहे,’’ असे हम्पीने सांगितले. ‘‘मी स्पर्धेत खेळेन याबाबत अजूनही खात्री नाही. माझा सहभाग परिस्थितीवर अवलंबून आहे. सध्या, ड्रोन हल्ले आणि भूमध्य समुद्रात तैनात युद्धनौका पाहता मला सुरक्षेची चिंता वाटत आहे. अलीकडेच इस्रायल आणि लेबनॉनमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे मी तिथे जाण्यास थोडी कचरत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर माझ्या सहभागाबद्दल मला शंका आहे,’’ असे हम्पी म्हणाली.
कोण आहेत रोझेनस्टीन
रोझेनस्टीन हे जर्मनीस्थित ‘डब्ल्यूआर ग्रुप होल्डिंग’चे अध्यक्ष आहेत आणि ‘डब्ल्यूआर चेस’ या कंपनीच्या माध्यमातून ते जगभरातील अनेक बुद्धिबळ स्पर्धांना तसेच खेळाडूंना पाठिंबा देतात. ‘डब्ल्यूआर चेस’चे ‘फिडे’सोबत आधीपासूनच संबंध आहेत. त्यांनी जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ‘फिडे’सोबत भागीदारी केली आहे.
‘फिडे’ने स्पर्धेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला, तर दोन्ही कँडिडेट्स स्पर्धांच्या आयोजनासह खेळाडूंचा सर्व खर्च ‘डब्ल्यूआर चेस’द्वारे पूर्णपणे उचलला जाईल. खेळाडूंची सुरक्षितता, स्पर्धेची अखंडता टिकवून ठेवणे आणि स्पर्धा सर्वोत्तम परिस्थितीत पार पडेल याची खात्री देणे याला आमचे प्राधान्य असेल, असेही रोझेनस्टीन यांनी पुढे म्हटले आहे.
हम्पीने माघार घेतल्यास काय?
‘फिडे’च्या नियमांनुसार, जर हम्पीने समाधानकारक कारण न देता स्पर्धेतून माघार घेतली, तर भारताच्या या अव्वल महिला खेळाडूला सुमारे १० लाख रुपये (१० हजार युरो) दंड होऊ शकतो. त्याचबरोबर ‘फिडे’ला युक्रेनची ग्रँडमास्टर ॲना मुझिचुकला शेवटच्या क्षणी आमंत्रित करावे लागेल.
