पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वात काम करणं निव्वळ अशक्य आहे अशा शब्दात पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणून कर्स्टन यांची नियुक्ती झाली होती मात्र सहा महिन्यात त्यांनी राजीनामा दिला होता.

एप्रिल २०२४ मध्ये गॅरी कर्स्टन यांची पाकिस्तानचे वनडे आणि टी२० प्रकाराचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा होता. मात्र असं असतानाही त्यांनी अवघ्या सहा महिन्यात राजीनामा दिला. कर्स्टन यांनी राजीनाम्यासंदर्भात धक्कादायक गोष्टी सांगितल्या.

कर्स्टन यांनी टॉकस्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘पाकिस्तान क्रिकेटमधलं वातावरण विखारी आहे. प्रत्येक कामात हस्तक्षेप केला जातो. व्यावसायिकतेचा अगदीच अभाव आहे. मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वात काम करणं आणि संघाला जिंकून देणं जवळपास अशक्य होतं’.

‘ज्या गोष्टीने मी सगळ्यात व्यथित झालो ते म्हणजे माझ्या प्रत्येक कामात सातत्याने हस्तक्षेप केला जात असे. मी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. निवृत्ती घेतल्यानंतर जगभरात अनेक संघांचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे. कुठेच अशा पद्धतीची कामात ढवळाढवळ पाहिली नाही. जे होतं ते अनाकलनीय होतं’.

‘कोचिंग स्टाफला बळीचा बकरा बनवला जात असे. खेळाडूंची मोट बांधून त्यांना जिंकण्यासाठी मार्गदर्शन करणं हे माझं आणि सहकाऱ्यांचं काम होतं. मात्र बाहेर एवढी सुंदोपसुंदी सुरू असताना काम करणं निव्वळ अशक्य होतं. खराब कामगिरी झाल्यावर खेळाडूंवर दंडात्मक कारवाई केली जात असे’, असं कर्स्टन यांनी सांगितलं.

‘संघाची कामगिरी चांगली झाली नाही तर तुम्ही लक्ष्य होता. प्रशिक्षकांना हटवा किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा असा सूर असतो. हे करणं सोपं असतं. मात्र त्याचा वाईट परिणाम होतो. असंच करायचं असेल तर प्रशिक्षकाची गरजच काय? असा सवाल कर्स्टन यांनी केला आहे.

कर्स्टन हे भारतीय संघाचे २००८ ते २०११ या कालावधीत मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनातच भारतीय संघाने २०११ वनडे वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला. २०११ ते २०१३ या काळात त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं. त्यांच्या कार्यकाळातच दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेण्याचा मान पटकावला. एप्रिल २०१४ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कर्स्टन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. मात्र बोर्ड आणि त्यांच्यात बेबनाव झाल्याने कर्स्टन यांनी सहा महिन्यात राजीनामा दिला. नुकत्याच आटोपलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत कर्स्टन नामिबिया संघाचे मेन्टॉर म्हणून कार्यरत होते.