FIFA World Cup 2026 Cape Verde Creates History: फिफा विश्वचषक २०२६ मधील सर्वच सामने अटीतटीचे होताना दिसत आहेत. अगदी पहिल्यांदाच फिफा विश्वचषक खेळत असलेल्या संघांनी कमालीची कामगिरी करत सर्वांना थक्क केलं. याचबरोबर पहिल्यांदाच फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला केप व्हर्डे देश राऊंड ऑफ-३२ साठी क्वालिफाय झाला आहे. स्पेनला एकही गोल करू न दिलेल्या व्होझिन्या आणि पहिल्याच सामन्यातील संघाच्या कामगिरीमुळे केप व्हर्डे देश चर्चेत आला आणि आता संघाने पुढील फेरीत स्थान मिळवलं असून तिथे त्यांचा सामना वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिनाशी होणार आहे.

ग्वाडालाजारा आणि ह्यूस्टन येथे शुक्रवारी रात्री जवळपास एकाच वेळी सामने संपल्याच्या शिट्ट्या वाजल्या. ग्वाडालाजारामध्ये उरुग्वेचा स्पेनकडून ०-१ असा पराभव झाला, तर ह्यूस्टनमध्ये केप व्हर्डेने सौदी अरेबियाला गोलशून्य बरोबरीत रोखत बाद फेरी गाठल्याचा संघाने जल्लोष केला. ह्यूस्टनमध्ये केप व्हर्डेने सौदी अरेबियाला गोलशून्य बरोबरीत रोखत इतिहास घडवला. ४८ संघांच्या विस्तारित फिफा विश्वचषकातील सर्वात मोठ्या अपसेटपैकी एक मानल्या जाणाऱ्या या निकालामुळे केप व्हर्डेने आपल्या बचावात्मक खेळाच्या जोरावर ग्रुप एचमधील कोणत्याही संघाला विजय मिळवू दिला नाही. या बरोबरीमुळे उरुग्वेचे गट टप्प्यातील आव्हानही संपुष्टात आलं आणि केप व्हर्डेने ऐतिहासिक कामगिरी करत विश्वचषकात आपली वेगळी छाप पाडली.

नकाशावरही न दिसणाऱ्या केप व्हर्डेने FIFA World Cupमध्ये इतिहास घडवला

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत असलेल्या ज्वालामुखीजन्य १० बेटांचा छोटासा देश केप व्हर्डेने आपल्या पहिल्याच फिफा विश्वचषकात इतिहास लिहिला आहे. ग्रुप एचमध्ये दुसरं स्थान पटकावत त्यांनी बाद फेरीत धडक मारली. अवघ्या ५६ वर्षीय प्रशिक्षक बुबिस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा केप व्हर्डेचा संघ विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचणारा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात छोटा देश ठरला. विशेष म्हणजे, अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच या संघाने प्रथमच विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती.

केप व्हर्डेने स्पर्धेची सुरुवात माजी विश्वविजेत्या स्पेनला ०-० अशी बरोबरीत रोखून केली होती. त्या सामन्यातील भक्कम बचावामुळे त्यांच्या शिस्तबद्ध खेळाची झलक पाहायला मिळाली. मात्र, ते केवळ बचावावर अवलंबून नसून आक्रमणातही प्रभावी ठरू शकतात, हे त्यांनी दुसऱ्या सामन्यात उरुग्वेविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधत सिद्ध केलं. या निकालामुळे त्यांच्या बाद फेरीच्या आशा अधिक बळकट झाल्या.

साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात केप व्हर्डेला बाद फेरी गाठण्यासाठी केवळ पराभवापासून वाचायचं होतं. दुसरीकडे, स्पेनने अ‍ॅलेक्स बाएनाच्या ४२व्या मिनिटातील गोलच्या बळावर उरुग्वेचा १-० असा पराभव केला. त्यामुळे सौदी अरेबियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधण्यात केप व्हर्डेचा अभेद्य बचाव निर्णायक ठरला आणि त्यांनी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

मात्र, आता केप व्हर्डेसमोरचं आव्हान अधिक कठीण असणार आहे. विश्वचषकातील पदार्पणातच इतिहास रचणाऱ्या केप व्हर्डेचा राऊंड ऑफ ३२ मध्ये विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिनाशी सामना होणार असून, हा सामना ४ जुलै रोजी मियामी येथे खेळवला जाणार आहे.