वृत्तसंस्था, ॲटलांटा : गोलकक्षात उभी केलेली बचावाची भक्कम भिंत आणि त्याचे नेतृत्व करणारा गोलरक्षक वोझिन्या यांच्या प्रयत्नपूर्वक खेळाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात प्रथमच खेळणार्‍या केप व्हर्डे संघाने बलाढ्य स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखले. या बरोबरीने केप व्हर्डे संघाने पदार्पणातल्या सामन्यातच पहिला गुण मिळविण्याची किमया साधली.

आपल्या विश्वचषक पदार्पणाच्या सामन्यातच, केप व्हर्डेने माजी विजेत्या स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखले आहे. सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्या देशाच्या संघाने स्पर्धेतील एका प्रबळ दावेदाराविरुद्ध संपूर्ण ९० मिनिटे धैर्याने लढा दिला आणि त्यांना गोल करण्यापासून रोखून धरले. केप व्हर्डेच्या शिस्तबद्ध बचावामुळे आणि जिद्दी खेळाने त्यांना हा अविस्मरणीय निकाल मिळवून दिला. केप व्हर्डेच्या फुटबॉल इतिहासात हा क्षण प्रदीर्घ काळासाठी स्मरणात ठेवला जाईल. वोझिन्याने संपूर्ण सामन्यात स्पेनचे आठ गोल थेट अडवले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे स्पेनच्या संघाने चेंडूवर आपले नियंत्रण राखण्यावर भर दिला. स्पेनच्या मध्यरक्षकांनी केप व्हर्डेच्या गोलकक्षात वारंवार शिरकाव केला. मात्र, त्यांना केप व्हर्डे संघाचा बचाव भेदता आला नाही. कमकुवत वाटणार्‍या केप व्हर्डे संघाने मैदानावर मात्र जबरदस्त लढाऊ वृत्ती दाखवली. स्पेनच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी त्यांनी ‘लो-ब्लॉक’ बचाव रणनीती वापरली. ज्यामुळे स्पेनला गोल करण्याच्या स्पष्ट संधी मिळण्यापासून वंचित रहावे लागले. खेळाच्या २०व्या मिनिटाला स्पेनला गोल करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, केप व्हर्डेच्या गोलरक्षकाने अप्रतिम झेप घेत चेंडू अडवला आणि संघाचे संकट टाळले.