अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा अशा तीन देशांनी आयोजित केलेल्या वर्ल्डकपचं रविवारी रात्री उशिरा सूप वाजलं. संपूर्ण स्पर्धेत सांघिक कामगिरीवर भर देणाऱ्या स्पेनने अर्जेंटिनाचा वारू रोखत १६ वर्षांनंतर विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. टोरेसचा गोल स्पेनसाठी किमयागार ठरला. महिनाभर चाललेल्या या फुटबॉल मैफलीत खेळाच्या बरोबरीने अनेक राजकीय, सामाजिक घटना घडल्या. नकाशावर टिंबाएवढंही नसलेल्या देशाची जगभर चर्चा झाली. या वर्ल्डकपच्या निमित्ताने स्थलांतराची प्रक्रिया किती किमयागार ठरू शकते याचा प्रत्यय आला. एकीकडे युद्ध सुरू असताना इराणचा संघ अमेरिकेत खेळला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एका खेळाडूसाठी मध्यस्थी केली. या आणि असंख्य घटनांचा घेतलेला वेध
सोमालियाच्या रेफरीला अमेरिकेने नाकारला प्रवेश
सोमालियाचे रेफ्री ओमर अर्टन यंदाच्या वर्ल्डकपमध्ये काम पाहणार होते. मात्र अमेरिकेने त्यांना प्रवेश नाकारला. गेल्यावर्षीच रेफ्री ऑफ द इयर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मात्र दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अमेरिकेने त्यांना परवानगी दिली नाही. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं अर्टन यांच्याकडे होती मात्र तरीही त्यांना परतावं लागलं. अमेरिकेच्या या निर्णयावर जगभरात जोरदार टीका झाली. एका सन्माननीय रेफरीला अशी वागणूक कशी देण्यात येते यावरून अमेरिकेच्या प्रशासनाला प्रचंड टीका आणि ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. मात्र अमेरिकेने ओमर यांच्यासंदर्भातला निर्णय बदलला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इन्फॅन्टिनो यांना कॉल आणि एका मॅचचं निलंबन रद्द
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ल्डकपस्पर्धेदरम्यान आणखी एक वाद ओढवून घेतला. अमेरिकेचा खेळाडू फोलारिन बालोगनला बोस्निया हर्झेगोविनाविरुद्धच्या लढतीत रेड कार्ड दाखवण्यात आलं. रेड कार्ड नियमानुसार, त्याच्यावर एका सामन्यापुरती बंदी आली. यामुळे सोमवारी होणाऱ्या अमेरिकेच्या बेल्जियमविरुद्धच्या लढतीत तो खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. हा प्रकार लक्षात येताच वर्ल्डकपच्या यजमान देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट फिफाचे प्रमुख जिआनी इन्फॅन्टिनो यांना कॉल केला. ट्रम्प आणि इन्फॅन्टिनो म्हणजेच पर्यायाने व्हाईट हाऊस आणि फिफा यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर काही तासात बालोगन याच्यावरील एका सामन्याची बंदी हटवण्यात आली आहे. रेड कार्डानंतर एका सामन्याची बंदी हा नियम आहे. मात्र जागतिक महासत्तेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी थेट फिफालाच नियम वाकवायला लावला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ११ खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आलं आहे. त्यापैकी प्रत्येकाला पुढच्या सामन्यात खेळता आलेलं नाही. मग अमेरिकेच्या बालोगनला नियमात सूट का? असा सवाल केला जात आहे. फिफाने यासंदर्भात काहीही औपचारिक भाष्य केलेलं नाही. दरम्यान संघांना रेड कार्डविरोधात दाद मागण्याचा अधिकार नाही. फिफाने बालोगनचं एका सामन्यापुरतं निलंबन रद्द करताना नियम २७चा उल्लेख केला. या नियमानुसार फिफाला खेळाडूवरील बंदी हटवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
केप व्हर्दे आणि पोस्टरबॉय गोलकीपर व्होन्झिको
यंदाचा वर्ल्डकप स्पेनने जिंकला असला तरी मनं नकाशात अक्षरक्ष: एका ठिपक्याएवढ्या दिसणाऱ्या केप व्हर्देने जिंकली. अवघ्या ५ लाख लोकसंख्येच्या केप व्हर्देने बलाढ्य संघांना गोलसाठी झुंजवलं. ४० वर्षीय गोलकीपर व्होन्झिको हा यंदाच्या वर्ल्डकपचा पोस्टरबॉय ठरला. परिस्थितीशी संघर्ष करत व्होन्झिकोने फुटबॉलचा ध्यास जपला. सुरुवातीच्या लढतीला व्होन्झिकोच्या आईला येता आलं नव्हतं. याचा सल त्याच्या मनात होता. मात्र आईसमोर खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं.
स्थलांतर आवडे सर्वांना
स्थलांतर ही या वर्ल्डकपची थीम ठरली असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत आधी झालेल्या अन्य कुठल्याही वर्ल्डकपच्या तुलनेत सर्वाधिक स्थलांतरित खेळाडू खेळले. क्रीडाजगताचा कुंभमेळा असं वर्णन होणाऱ्या या स्पर्धेत १२४८ खेळाडू सहभागी होत आहेत. यापैकी २५ टक्के म्हणजे ३००हून अधिक खेळाडू ज्या देशात त्यांचा जन्म झाला आहे त्याऐवजी वेगळ्या देशाकडून खेळत आहेत.क्युराको हा टिंबाएवढ्या देशाच्या संघातले ९६ टक्के खेळाडू विदेशात जन्मलेले आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो संघाचं हे प्रमाण ८५ तर मोरोक्कोचं ७३ टक्के आहे. ज्या देशातून खेळाडू स्थलांतरित झालेत आणि ज्या देशात स्थायिक झालेत यांच्यात कोणतंही साधर्म्य नसतानाही कामगिरी उंचावत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्थिक सुबत्ता तसंच फुटबॉलची परंपरा यापल्याड खेळाडूंना स्थलांतरामुळे फायदा होत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
वायकिंग सेलिब्रेशन
जगातल्या विकसित देशांच्या यादीत अग्रणी असलेल्या नॉर्वेच्या खेळाडूंचं वायकिंग सेलिब्रेशन चर्चेत राहिलं. सेनेगलविरुद्धच्या थरारक विजयानंतर नॉर्वेच्या खेळाडूंनी वायकिंग म्हणजे बोटीत बसून वल्हे मारत असल्याचं सेलिब्रेशन केलं. युरोपच्या उत्तरेकडील स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क आदी देशांचा प्रदेश स्कँडेनेव्हिया म्हणून ओळखला जातो. या प्रदेशातील नागरिकांचे समुद्राशी पूर्वापार आणि गहिरे नाते आहे. त्यांना व्हायकिंग म्हणून संबोधले जाते आणि इस. ७९० ते १०६६ (आठवे ते अकरावे शतक) हा काळ व्हायकिंग युग म्हणून ओळखला जातो. व्हायकिंग लोकांनी त्यांच्या नौदलाच्या जोरावर इंग्लंडसह युरोपच्या बऱ्याच भागात आणि अटलांटिक महासागरापार मोहिमा केल्या.ते व्यापारी, शासक आणि लुटारू म्हणूनही जाणले जात. बरेचदा व्हायकिंग्ज हा शब्द पायरेट्स किंवा सागरी चाचे अशा अर्थानेही वापरला जातो. त्यांनी केलेल्या मोहिमांच्या यशात त्यांच्या खास नौकांच्या रचनेचा वाटा मोठा आहे.
VAR प्रणाली वादात
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खेळात अधिक पारदर्शकता यावी याउद्देशाने फुटबॉलमध्ये व्हीएआर प्रणाली लागू करण्यात आली. व्हीडिओ असिस्टंट रेफरी अर्थात VAR हे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त ठरले. मैदानावरच्या रेफरींना एखाद्या निर्णयाबद्दल शंका असेल किंवा निर्णय घेण्यासाठी समाधानकारक कारण नसेल तर व्हीएआरची मदत घेतली जाते. मैदानावर काही चुकीचं घडलं असेल किंवा फाउल झाला असेल तर हे सिस्टीम रेफ्रीला अलर्ट देण्याचं काम करतं. हे सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी एक VAR अधिकारी असतो. तर त्याला साथ देण्यासाठी ३ सहायक VAR अधिकारी असतात. हे अधिकारी संपूर्ण सामन्यादरम्यान घडणाऱ्या प्रत्येक कृतीवर बारकाईने लक्ष देऊन असतात. गोल झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी- यादरम्यान ऑफ साईड आहे की नाही, पेनल्टीच्या वेळी लाईन क्रॉस झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी ही प्रणाली वापरतात. पेनल्टी- पेनल्टी आहे की नाही, फाउल झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी VAR चा वापर केला जातो. रेड कार्ड- खेळाडूला खरंच रेड कार्ड द्यायला हवं का? फाउल खरंच इतका गंभीर होता का? हे तपासून पाहण्यासाठी VAR चा वापर केला जातो. रेफ्रीने चुकून दुसऱ्याच खेळाडूला मैदानाबाहेर तर नाही पाठवलं ना? हे तपासून पाहण्यासाठी VARचा वापर केला जातो. अर्जेंटिना-इजिप्त लढतीत इजिप्तचा एक गोल VAR प्रणालीने अवैध ठरवला. तो गोल इजिप्तला मिळाला असता तर त्यांनी ३-० अशी बढत घेतली असती. अर्जेंटिनाच्या या निर्णयाचा फायदा उचलत पुनरागमन केलं आणि बाजी मारली. अन्य लढतीतही व्हीएआर सर्वसमावेशक नाही अशी टीका झाली.
अर्जेंटिनाला झुकतं माप?
मेस्सीला आणि अर्जेंटिनाला जिंकून देण्यासाठीच वर्ल्डकप भरवण्यात आला आहे अशी टीका स्पर्धेदरम्यान वारंवार पाहायला मिळाली. अर्जेंटिनाच्या खेळाडूंना सातत्याने पेनल्टी किक मिळणं, त्यांच्या खेळाडूंना यलो कार्ड किंवा रेड कार्ड दाखवण्यात न येणं, व्हीएआर प्रणालीमध्ये त्यांना झुकतं माप मिळणं, त्यांचे सामने संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी आयोजित करणं या सगळ्यामुळे फिफा अर्जेंटिनाधार्जिणी आहे असा आरोप चाहत्यांनी, माजी खेळाडूंनी, तज्ज्ञांनी देखील केला. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या भोवती एक प्रचंड अर्थकारण उभं आहे. म्हणून फायनलपर्यंत अर्जेंटिना असणं अत्यावश्यक आहे असंही ऐकायला मिळालं. दुसरीकडे आम्ही मेहनतीने फायनलपर्यंत पोहोचलो आहोत, आम्हाला कोणी आयतं वाढून दिलेलं नाही अशा शब्दांत मेस्सीने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.
अव्वाच्या सव्वा तिकीटं
चार वर्षांपूर्वी कतारमध्ये झालेल्या वर्ल्डकपवेळी हजारो सर्वसामान्य चाहत्यांनी मैदानात जाऊन खेळाचा याचि देही याचि डोळा आनंद अनुभवला. यंदाच्या वर्ल्डकपचं आयोजन अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाने केलं होतं. उत्तरार्धातले सामने तर अमेरिकेत होते. मात्र तिकीटदरांमध्ये अमेरिकेने पाचपट वाढ केल्याचं उघड झालं. गेटमनी अर्थात तिकिटांच्या माध्यमातून येणारा पैसा हा फिफासाठी आर्थिक कमाईच्या साधनांपैकी एक आहे. पाचपट दर असूनही सामन्यांना सरासरी ६०,००० पेक्षा जास्त प्रेक्षक आल्याचं आकडेवारी सांगते. मात्र अनेकांनी हे दर परवडणारे नसल्याने टीव्हीवरच सामने पाहणं पसंत केलं. फायनलच्या मुकाबल्यासाठी तिकिटांचे दर लाखांमध्ये पोहोचल्याची चर्चा होती.
हायड्रेशन ब्रेक की पैसा मिळवण्याचा छुपा मार्ग
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फिफाने हायड्रेशन ब्रेक नावाची संकल्पना राबवली. अतिउष्णतेचा, आर्द्रतेचा खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रत्येक सत्रात हायड्रेशन ब्रेक घेण्यात आला. ३ मिनिटं खेळाडूंना विश्रांती मिळते. पाणी, एनर्जी ड्रिंक, फळं खातापिता येतं. सपोर्ट स्टाफला खेळाडूंशी संवाद साधता येतो. डावपेच आखता येतात. खेळाडूंच्या आरोग्याचा मुद्दा खरा असला तरी हायड्रेशन ब्रेकच्या माध्यमातून फिफाने जाहिराती दाखवून आणखी पैसा कमावल्याची चर्चा आहे. हायड्रेशन ब्रेकमुळे ऐन भरात आलेला सामना थांबतो, लय तुटतो अशी तक्रार काही खेळाडू आणि संघांनी केली.
फॉकलंड बेटं आमचीच- अर्जेंटिनाचा दाव्याने खळबळ
अर्जेंटिनाने नाट्यमय अशा सेमी फायनलच्या लढतीत इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये धडक मारली. सामना जिंकल्यानंतर एक बॅनर फडकावल्याने अर्जेंटिनाचे खेळाडू वादात सापडले. मिडफिल्डर जिओव्हेनी लो सेल्कोने ‘फॉकलंड बेटं आमचीच’ असा बॅनर फडकावत इंग्लंडविरुद्ध विजयाचा आनंद साजरा केला. फिफाच्या नियमानुसार मैदानावर कोणत्याही प्रकारे राजकीय, राजकीय, सामाजिक भाष्य करण्यास परवानगी नाही. तोंडी, लेखी तसंच कोणत्याही प्रकारे जर्सी, झेंडा, फलक अशाप्रकारे संदेश दिल्यास कारवाई होऊ शकते. अर्जेंटिनाने या बेटांना ‘लास माल्विनास’ असं नाव दिलं आहे. अर्जेंटिनाच्या पूर्वेला साधारण ५०० किमी अंतरावर हे बेट आहे. सुमारे १२००० किमी एवढं या बेटांचं क्षेत्रफळ आहे. इंग्लंडने काबीज केलेल्या या परिसराला रक्तरंजित इतिहास आहे. या बेटांच्या सार्वभौमत्वावरून इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात जुना वाद आहे. १९८२ मध्ये अर्जेंटिनाने बेटं ताब्यात घेण्यासाठी लष्करी आक्रमण केलं. या लढाईला ‘फॉकलंड वॉर’ असं नाव मिळालं. २ एप्रिल ते १४ जून असं हे युद्ध चाललं. अर्जेंटिनाच्या फौजेने शरणागती पत्करताच हे युद्ध थांबलं. या युद्धात ६४९ अर्जेंटिनाचे सैनिक, २५५ ब्रिटिश सैनिक तर ३ नागरिकांचा मृत्यू झाला. आजही या बेटांवर इंग्लंडचंच राज्य आहे.
यमालचा मेस्सीबरोबरचा फोटो आणि त्याचा छोटा भाऊ
२००७ मध्ये युनिसेफच्या कार्यक्रमाअंतर्गत मेस्सीने लहानग्या यमालला न्हाऊमाखू घातलं होतं. जवळपास २० वर्षांनंतर यमाल मेस्सीविरुद्ध वर्ल्डकप फायनलमध्ये उभा ठाकला. विशीतला यमाल आणि चाळिशीतला मेस्सी अशी अनोखी जुगलबंदी पाहायला मिळाली. फुटबॉल परंपरेची मशाल मेस्सीकडून यमालकडे संक्रमित झाली असंही काहींना वाटलं. यमालच्या बरोबरीने त्याचा छोटा भाऊ वर्ल्डकपकाळात व्हायरल झाला. यमालला पाठिंबा देण्यासाठी त्याचा लहान भाऊ मैदानात असे. गोंडस चेहऱ्याचा केन आपल्या भावाला आवाजी पाठिंबा देत असे. सरावादरम्यान यमाल आणि तो लुटूपुटूचा फुटबॉल खेळत. वर्ल्डकप फायनलनंतरही यमाल त्याला उचलून घेऊन मैदानाला फेरी मारत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला.
एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे इराणचा संघ अमेरिकेत खेळला
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग वेठीस धरलं गेलं. जगभरात अनेक देशांना इंधनटंचाईसह विविध प्रश्नांना सामोरं जावं लागलं. हॉर्मुझची सामु्द्रधुनी हा सगळ्यात चर्चिल विषय ठरला. अशा परिस्थितीत इराण अमेरिकेत होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळणार का? हा प्रश्न होता. मात्र खेळाचं व्यासपीठ असल्याने ते शक्य झालं. इराणच्या संघाचा बेस मेक्सिकोत ठेवण्यात आला. इराणच्या अमेरिकेतल्या सामन्यांसाठी अभूतपूर्व अशी सुरक्षाव्यवस्था होती. इराणची न्यूझीलंडविरुद्धची लढत ०-० बरोबरीत सुटली तर बेल्जियमविरुद्धही गोलशून्य बरोबरी झाली. इराणने प्राथमिक लढतीतून गाशा गुंडाळला.
अर्लिंग हालंडचा स्वॅग
अनोखी केशरचना, बकासुरी वाटावा असा आहार, ब्रँडेड लाईफस्टाईल आणि गोल करण्याची अद्भुत क्षमता यामुळे नॉर्वेचा अर्लिंग हालंड संपूर्ण स्पर्धेदरम्यान चर्चेत राहिला. नॉर्वे जिंकल्यानंतर वायकिंग सेलिब्रेशनमधला पुढाकार असो, दोन शिंगं डोक्यावर लावून केलेलं सेलिब्रेशन असो, प्रचंड आहार असो किंवा मायदेशी परतताना टॅकूनचं सोव्हेनियर असो- अर्लिंग हालंड हे नाव वर्ल्डकपच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलं.
