अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : दोन वर्षांपूर्वी सी. के. नायडू स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आम्हाला विदर्भाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदाच्या अंतिम सामन्यात त्या पराभवाची परतफेड करतानाच जेतेपदाला गवसणी घालण्याचे आमचे ध्येय होते. हे ध्येय साध्य झाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचा कर्णधार हार्दिक तामोरेने व्यक्त केली.

मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भाला ७५ धावांनी पराभूत करत सात वर्षांनंतर सी. के. नायडू स्पर्धेचे जेतेपद मिळवले. ‘‘अखेरच्या दिवशी फिरकीपटूंना मदत मिळण्यास सुरुवात झाली. आमची दुसऱ्या डावात ८ बाद ६२ अशी स्थिती होती. त्यावेळी मी शाम्स मुलानी आणि अरमान जाफर यांच्यासोबत चर्चा करत होतो. या अवघड खेळपट्टीवर आम्ही विदर्भाच्या फलंदाजांना रोखू शकतो याची आम्हाला खात्री होती. सर्वाच्या योगदानामुळेच अखेर आम्ही विजय मिळवला,’’ असे हार्दिकने सांगितले.

तसेच अंतिम सामन्यात ११ गडी बाद करणाऱ्या शाम्सविषयी हार्दिक म्हणाला, ‘‘शाम्स आणि मी अनेक वर्षांपासून एकत्रित खेळत आहोत. अष्टपैलू म्हणून त्याची गुणवत्ता मला ठाऊक आहे. बाद फेरीपूर्वी त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूचा संघात समावेश झाल्याने अन्य खेळाडूंचाही आत्मविश्वास वाढला. अंतिम सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत सामन्याला कलाटणी दिली.’’

संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी!

मुंबईच्या संघाने यंदाच्या संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली. त्यामुळे सर्व खेळाडूंचा मला अभिमान आहे, असे मुंबईचे प्रशिक्षक राजेश पवार म्हणाले. ‘‘साखळी फेरीमध्ये एका गटात चार संघांचा समावेश होता; पण यातून एकच संघ आगेकूच करणार होता. आमच्या गटात तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मणिपूर हे संघ असल्याने सर्वच सामन्यांमध्ये विजयासाठी दडपण होते. मात्र आमच्या खेळाडूंनी सांघिक कामगिरी केल्याने आम्ही सर्व सामने जिंकले. मग बाद फेरीत आम्ही कर्नाटक, राजस्थान आणि अखेरीस विदर्भाला पराभूत केले. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये युवा खेळाडूंनी चमक दाखवली, तर बाद फेरीमध्ये शाम्समुळे संघाला बळकटी मिळाली. आमच्या जेतेपदात त्याचा मोलाचा वाटा आहे,’’ असे पवार यांनी नमूद केले.