दुखापतीमुळे खेळाडू संघाबाहेर जाणं समजू शकतो पण कागदपत्रातल्या कारकुनी चुकीमुळे थेट कर्णधारालाच संघाबाहेर जावं लागण्याची वेळ ओढवली आहे. हा प्रसंग घडला आहे इंग्लंडमधल्या काऊंटी क्रिकेटमध्ये. मिडलसेक्स संघाच्या नेतृत्वाची धुरा लेयूस डू प्लॉय कडे होती. मात्र तांत्रिक चुकीमुळे त्यालाच संघाबाहेर जावं लागलं आहे.
३१वर्षीय लेयूसचा जन्म दक्षिण आफ्रिकेचा. मात्र हंगेरीचा पासपोर्ट असल्याने तो काऊंटी क्रिकेटमध्ये लोकल अर्थात स्थानिक खेळाडू म्हणून खेळतो. इंग्लंडसाठी खेळण्याची त्याची इच्छा व्यक्त केली होती.
लेयूस आणि मिडलसेक्स संघाचा करार २०२७ पर्यंत आहे. मात्र रविवारी मिडलसेक्स संघव्यवस्थापनाने लेयूसचा अखेरचा हंगाम असेल असं जाहीर केलं. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची मनीषा व्यक्त केली. तसं झाल्यास लेयूसच्या नावाची नोंदणी विदेशी खेळाडू म्हणून करावी लागेल. मिडलसेक्स संघाला लेयूसने मन बदललं याची कल्पना नव्हती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या नियमावलीनुसार लेयूसने असं जाहीर केल्यामुळे त्याला स्थानिक खेळाडू म्हणून काऊंटी क्रिकेटमध्ये खेळता येणार नाही. कारण लेयूसला दक्षिण आफ्रिकेचा मानण्यात येईल.
मिडलसेक्स संघाच्या ताफ्यात विदेशी खेळाडूसाठीची एका जागा रिकामी आहे मात्र रविवारी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. विदेशी खेळाडूंच्या नोंदणीसाठी रविवारची मुदत होती. लेयूसला स्थानिक खेळाडू म्हणूनच खेळता यावं यासाठी मिडलसेक्स संघाने इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलणी केली. मात्र डरहॅमविरुद्धच्या लढतीत लेयूस मिडलसेक्स संघाचा भाग नव्हता. मॅक्स होल्डनने संघाचं नेतृत्व केलं.
तांत्रिक नोंद स्थानिक खेळाडू अशी मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणार असल्याने क्षणार्धात लेयूसला संघाबाहेर जावं लागलं आहे. विदेशी खेळाडू नोंदणीची तारीख ६ सप्टेंबर होती. त्यावेळी मिडलसेक्स संघाला जाग न आल्याने कर्णधारालाच गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
