लंडन : विराट कोहलीच्या कामगिरीची इतकी चर्चा का होत आहे, हेच मला कळत नाही. क्रिकेटपटूच्या कारकीर्दीत चढ-उतार येतच असतात, असे म्हणत भारताचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा तारांकित फलंदाज कोहलीला पाठबळ दिले आहे.

भारतीय संघाला गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यात कोहली २५ चेंडूंत केवळ १६ धावा करून माघारी परतला. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला पाचव्या कसोटीत ११ आणि २० धावा, त्यानंतर दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत अनुक्रमे १ आणि ११ धावाच करता आल्या. मग दुखापतीमुळे त्याला पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करतानाही त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार रोहितला कोहलीच्या संघातील स्थानाबाबत विचारण्यात आले. मात्र हे त्याला फारसे आवडले नाही.

‘‘कोहली प्रदीर्घ काळ देशाचे प्रतिनिधित्व करत असून त्याने अनेक सामने खेळले आहेत. तो उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे आम्ही त्याला संघातील स्थान सुरक्षित असल्याचे आश्वासन देण्याची गरज नाही. मी यापूर्वीही म्हणालो होतो की, खेळाडूंची कामगिरी वर-खाली होत असते. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारताला असंख्य सामने जिंकवून दिलेल्या कोहलीसारख्या खेळाडूला पुन्हा सूर गवसण्यासाठी केवळ एक-दोन डाव लागतात,’’ असे रोहितने सांगितले.

‘‘कोहलीच्या भारतीय संघातील स्थानाबाबत सतत चर्चा केली जात आहे. परंतु तुम्ही त्याची आजवरची कामगिरी, शतके आणि सरासरी पाहा. त्याच्या गाठीशी खूप अनुभव आहे. मग त्याच्यासारख्या खेळाडूबाबत सतत प्रश्न उपस्थित करणे कितपत योग्य आहे? आपल्या वैयक्तिक आयुष्यातही चढ-उतार येतच असतात,’’ असेही रोहित म्हणाला.

रोहितप्रमाणेच इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनेही कोहलीला पाठबळ दिले. ‘‘कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असून त्याने वर्षांनुवर्षे अप्रतिम कामगिरी केली आहे. प्रत्येक फलंदाजाच्या कारकीर्दीत असा टप्पा येतो, जेव्हा त्याला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश येते. त्याच्याकडून धावा होत नाहीत. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार म्हणून मला कोहलीची गुणवत्ता ठाऊक आहे. आम्हाला कायमच त्याच्यापासून सावध राहावे लागते,’’ असे बटलरने सांगितले.

कोहलीला कणखर राहण्याचा आझमचा सल्ला

कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची अनेकदा तुलना केली जाते. मात्र या दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचे वारंवार दिसून आले आहे. गुरुवारी पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यानंतर त्याच्यावर ‘ट्विटर’च्या माध्यमातून टीका केली जात होती. मात्र आझमने कोहलीला पाठबळ देताना ‘ट्विटर’वर संदेश लिहिला. ‘हा (कठीण) काळही निघून जाईल. कणखर राहा,’ असे बाबर ‘ट्वीट’मध्ये म्हणाला.

कोहलीला वगळल्यास आर्थिक नुकसान -पनेसार

कोहलीला संघातून वगळल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मोठा आर्थिक फटका बसू शकेल, असे मत इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसारने व्यक्त केले. ‘‘कोहली हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये येतात. कोहलीमुळे केवळ भारतीय नाही, तर अन्य क्रिकेट मंडळांचाही खूप फायदा झाला आहे. त्याला वगळण्याचे आर्थिक परिणाम ‘बीसीसीआय’ला भोगावे लागू शकतील. त्यांना मिळणारे प्रायोजक कमी होण्याची भीती आहे,’’ असे पनेसार म्हणाला. मात्र कोहलीला इतक्यात वगळणे योग्य नसून आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात त्याचा समावेश अनिवार्य असल्याचे पनेसारने नमूद केले.