अबू धाबी : कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे मनोबल वाढलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे ‘आयपीएल’मध्ये गुरुवारी होणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विजयपथावर परतण्याचे लक्ष्य आहे.

‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्याला मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्ज या कट्टर प्रतिस्पध्र्यांमधील सामन्याने सुरुवात झाली. रोहित आणि अष्टपैलू हार्दिक पंड्याविना खेळणाऱ्या मुंबईला २० धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, रोहित पूर्णपणे तंदुरुस्त असून कोलकाताविरुद्ध खेळणार आहे. चेन्नईविरुद्ध सौरभ तिवारीचा (नाबाद ५०) अपवाद वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबईची फलंदाजी अधिक बळकट होईल.

दुसरीकडे, कोलकाताला विजयी सुरुवात करण्यात यश आले. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला ९ गडी राखून धूळ चारली. या सामन्यात आंद्रे रसेल व फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. त्यामुळे त्यांचा चांगली कामगिरी सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल.