भारतीय संघाने महिला अंडर-१९ विश्वचषकचा पहिला हंगाम आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाने स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. पॉचेफस्ट्रुम येथील सेनवेस पार्कमध्ये हा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. या विजयानंतर बोलताना कर्णधार शफाली वर्मा झाली भावूक झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच विरोधी संघाला १७.१ षटकात ६८ धावांवर गुंडाळले केले. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाने १४ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून सौम्या तिवारी आणि गोंगडी तृषा यांनी सर्वाधिक २४-२४ धावांचे योगदान दिले.
महिला अंडर-१९ विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय कर्णधार शफाली वर्मा भावूक झाली. सामन्यानंतर बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. शफालीचा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या डोळ्यात अश्रू दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता. या आनंदाच्या अश्रूंसोबत ती सामन्यानंतर बोलताना दिसली.
शफाली वर्मा विश्वचषक विजेतेपदावर बोलताना म्हणाली,”सर्व मुली ज्या प्रकारे परफॉर्म करत आहेत आणि एकमेकांना सपोर्ट करत आहेत, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. समर्थन दिल्याबद्दल सपोर्ट स्टाफचे आभार, ज्या प्रकारे ते आम्हाला दररोज पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला सांगत आहेत की आम्ही चषक जिंकण्यासाठी येथे आहोत. सर्वांचे आभार. खेळाडू मला खूप साथ देत आहेत. मला हा सुंदर संघ दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार आणि चषक जिंकल्याबद्दल खूप आनंद झाला आहे.”
यानंतर टीम इंडियाने विजय साजरा केला. पुढच्या व्हिडिओमध्ये सेलिब्रेशनही दिसत आहे. टीम एकत्र आली आणि प्रथम फोटो क्लिक केले. यानंतर संपूर्ण संघाने ट्रॉफी उचलून जल्लोष केला. या आनंदासोबतच खेळाडूंमध्येही उत्साह दिसून येत होता. भारतीय संघाने पहिला महिला अंडर-१९ विश्वचषक जिंकून इतिहास रचला. कर्णधार शफाली वर्मा ट्रॉफी हवेत उचलताना दिसली. हे पाहून संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण होते.
महिला अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचा पहिला हंगाम भारतीय संघासाठी खूप चांगला होता. संघाने पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. यानंतर संघाने एकही सामना गमावला नाही आणि अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले.