न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा १९ वर्षीय कार्लोस अल्कराझ आणि इटलीचा २१ वर्षीय यानिक सिन्नेर या जागतिक टेनिसमधील दोन युवा ताऱ्यांमधील पाच सेटपर्यंत आणि सव्वापाच तास रंगलेल्या लढतीची पर्वणी चाहत्यांना पाहायला मिळाली. स्थानिक वेळेनुसार, मध्यरात्री २ वाजून ५० मिनिटांनी संपलेल्या या लढतीत अल्कराझने सरशी साधत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अमेरिकन खुल्या स्पर्धेतील हा सर्वात उशिरापर्यंत चाललेला सामना ठरला. 

रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच हे नामांकित टेनिसपटू आता कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असल्याने अल्कराझ आणि सिन्नेर यांसारख्या खेळाडूंकडे टेनिसचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. या दोघांनीही आपल्यातील प्रतिभा आणि गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.

अनेक उत्कृष्ट रॅलीजसह खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित अल्कराझने ११व्या मानांकित सिन्नेरवर ६-३, ६-७ (७-९), ६-७ (०-७), ७-५, ६-३ अशी मात केली. या लढतीत अल्कराझने पहिला सेट जिंकल्यानंतर सिन्नेरने दमदार पुनरागमन करताना पुढील दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये जिंकले. मग चौथ्या सेटमध्ये अल्कराझ ४-५ अशा फरकाने पिछाडीवर होता. मात्र, यावेळी त्याने केवळ ‘मॅच पॉइंट’ वाचवला नाही, तर सलग तीन गेम जिंकत सेटही जिंकला. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये सिन्नेरने अल्कराझची सव्‍‌र्हिस तोडली आणि ३-२ अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र अल्कराझने अधिक आक्रमक खेळ करताना सिन्नेरला पुनरागमनाची संधीच दिली नाही. त्याने सलग चार गेम जिंकत या सेटसह सामनाही आपल्या नावे केला.

आता उपांत्य फेरीत अल्कराझपुढे २२व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोचे आव्हान असेल. उपउपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालला पराभवाचा धक्का देणाऱ्या टिआफोने उपांत्यपूर्व फेरीत नवव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हला ७-६ (७-३), ७-६ (७-०), ६-४ असे पराभूत केले.

श्वीऑनटेक उपांत्य फेरीत   

महिलांच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक आणि सहावी मानांकित अरिना सबालेंका आमनेसामने येतील. श्वीऑनटेकने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जेसिका पेगुलावर ६-३, ७-६ (७-४) असा विजय मिळवला. सबालेंकाने सलग दुसऱ्यांदा अमेरिकन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना कॅरोलिना प्लिस्कोव्हाला ६-१, ७-६ (७-४) असे नमवले.

अल्कराझ आणि सिन्नेर यांच्यातील सामना स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री २ वाजून ५० मिनिटांनी संपला. त्यामुळे अमेरिकन खुल्या स्पर्धेतील हा सर्वात उशिराने संपलेला सामना ठरला. यापूर्वी अमेरिकन स्पर्धेत तीन सामने स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री २ वाजून २६ मिनिटांनी संपले होते.

अल्कराझ आणि सिन्नेर यांच्यातील सामना तब्बल पाच तास, १५ मिनिटे चालला. अमेरिकन स्पर्धेतील हा दुसरा सर्वात दीर्घकाळ चाललेला सामना ठरला. या स्पर्धेतील सर्वात दीर्घकाळ चाललेला सामना १९९२मध्ये स्टीफन एडबर्ग आणि मायकल चँग यांच्यात रंगला होता. हा सामना तब्बल पाच तास, २६ मिनिटे चालला होता.