रविवारी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क येथे टेनिसच्या इतिहासात एक नवं पर्व लिहिलं गेलं. कार्लोस अल्काराझने नोवाक जोकोविचचा पराभव करत २०२६च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. कार्लोस अल्काराझने आपल्या कारकिर्दीतील सातवं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. तब्बल तीन तास आणि दोन मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्यात चार सेट खेळले गेले. पण अखेरीस कार्लोस अल्काराझने बाजी मारत जेतेपद आपल्या नावे केलं आणि मोठा विक्रम आपल्या नावे केला.
कार्लोस अल्काराझने अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा 2-6, 6-2, 6-3, 7-5 असा पराभव करत आपलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद मिळवलं आणि जोकोविचच्या २५व्या ग्रँडस्लॅमचं स्वप्न भंगलं. या पराभवासह ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचला मिळालेला हा पहिलाच पराभव ठरला. यापूर्वी त्याने मेलबर्नमध्ये खेळलेल्या ११ अंतिम सामन्यांमध्ये अपराजित राहिला होता.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझचा हा पहिलाच अंतिम सामना होता. हा सामना जिंकत कार्लोस अल्काराझने विश्वविक्रमाला गवसणी घातली. कार्लोस अल्काराझने कारकीर्दीतील चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करत इतिहासातील सर्वात तरुण ‘करिअर स्लॅम’ विजेता होण्याचा मान पटकावला. वयाच्या फक्त २२व्या वर्षी त्याने करियर स्लॅम पूर्ण केलं आहे.
करियर स्लॅम म्हणजे काय?
ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणं हे टेनिसमधील मोठं यश मानलं जातं. दरवर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन या चार प्रमुख स्पर्धांमध्ये विजेतेपदासाठी खेळाडू झुंज देतात. मात्र, या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा एका खेळाडूने जिंकणं याला करियर स्लॅम म्हटलं जातं.
कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचचा पराभव करत चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा टप्पा पूर्ण केला आणि आपल्या कारकिर्दीतील पहिला ‘करिअर ग्रँडस्लॅम’ साकारला. या ऐतिहासिक यशासह अल्काराझ हा पराक्रम करणारा नववा आणि इतिहासातील सर्वात तरुण पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझने पहिला सेट गमावला, नोव्हाक जोकोविच विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या निर्धाराने आक्रमक सुरुवात करत होता. मात्र, अल्काराझने जबरदस्त पुनरागमन करत मेलबर्न पार्कमध्ये आपल्या पहिल्याच अंतिम सामन्यात पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावलं. जोकोविचचे आक्रमक फटकेही अफलातून चपळतेने त्याने परतवून लावले आणि ३८ वर्षीय प्रतिस्पर्ध्यावर सातत्याने प्रचंड दबाव ठेवला.
उपांत्य फेरीत दोन्ही खेळाडूंनी थकवणारे पाच सेटचे सामने जिंकले होते. तरीही, तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या अंतिम लढतीत त्यांनी उत्कृष्ट फिटनेस, ऍथलेटिसिझम आणि स्टॅमिना दाखवून दिला. जोकोविचचा विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदाचा प्रयत्न याआधीही अल्काराझ व जानिक सिनर यांनी अनेकदा रोखला आहे. उपांत्य फेरीत जोकोविचने सिनरवर मात केली होती आणि ओपन युगातील सर्वात वयस्क ग्रँडस्लॅम विजेता ठरण्याचं ध्येय डोळ्यासमोर होतं; मात्र अल्काराझविरुद्ध तो टप्पा गाठता आला नाही.

