वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : कमी वयातच टेनिस विश्वावर आपली स्वतंत्र छाप सोडणार्‍या स्पेनच्या कार्लोस अल्कराझने भविष्यात मोजक्याच स्पर्धा खेळण्याचे संकेत दिले आहेत. ‘एटीपी’च्या व्यावसायिक स्पर्धांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे खेळाडूंना प्रचंड थकव्याचा सामना करावा लागत असून, यातून खेळाडू जायबंदी होण्याची भीती वाढत असल्याचे त्याने म्हटले आहे.

एप्रिल महिन्यात मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे अल्कराझ प्रदीर्घ काळ टेनिसपासून दूर राहिला होता. अमेरिकन खुल्या स्पर्धेत पुनरागमन करणार्‍या अल्कराझने दुसर्‍या फेरीत जैम फारिया याचा ४-६, ६-०, ६-३, ६-२ असा पराभव केला. या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, त्याने टेनिसचे व्यग्र वेळापत्रक खेळाडूंसाठी घातक ठरत असल्याचे मत मांडले.

मनगटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी अल्कराझने चार महिन्यांचा वेळ घेतला. तो दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांनाही मुकला. पूर्ण ताकदीने खेळण्याची खात्री पटल्यानंतरच त्याने कोर्टवर पुनरागमन केले. ‘‘इतकी मोठी विश्रांती घेण्याची माझी खरे तर इच्छा नव्हती. पण अलीकडचे व्यग्र वेळापत्रक लक्षात घेऊन मला ही विश्रांती घ्यावी लागली. सध्याची स्थिती सर्व स्पर्धा खेळण्यासारखी नाही. त्यामुळे भविष्यात मी स्वत:हून काही मोठ्या सुट्या घेणार आहे. चार महिने नाही, पण एक-दोन महिने मी निश्चितपणे काही स्पर्धांमध्ये खेळणार नाही,’’ असे अल्कराझने स्पष्ट केले.

वेळापत्रकाचा विस्तार

‘एटीपी’ने २०२५ पासून आपल्या वेळापत्रकाचा विस्तार केला आहे. यामध्ये नऊ पैकी सात एटीपी मास्टर्स (१००० मानांकन) स्पर्धांचा कालावधी वाढवून तो १२ दिवसांचा करण्यात आला आहे. केवळ माँटो कार्लो आणि पॅरिस या स्पर्धांनीच आपले पारंपरिक एका आठवड्याचे स्वरूप कायम ठेवले आहे.

‘एटीपी’च्या दाव्याचे खंडन

खेळाडू त्यांचे वेळापत्रक स्वत: ठरवत असतात आणि संपूर्ण हंगामात सामन्यांची संख्या योग्य प्रमाणात राखली जावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ‘एटीपी’ने म्हटले आहे. मात्र, अल्कराझने हा मुद्दा खोडून काढताना ते वेळापत्रकात आणखी महत्त्वाच्या स्पर्धा जोडल्या जात आहेत. म्हणजेच अप्रत्यक्षपणे ते खेळाडूंना खेळण्यासाठी भाग पाडत आहेत, असे सांगितले. ‘एटीपी’ने बंधनकारक केलेल्या प्रत्येक स्पर्धेत खेळायचे असेल, तर काही मास्टर्स १००० आणि काही ग्रँडस्लॅम स्पर्धा धरून खेळाडूला वर्षातील ४० आठवडे घराबाहेर पडून खेळावे लागते, असे अल्कराझ म्हणाला.

वाढत्या दुखापतींची चिंता

टेनिस दौर्‍यांमध्ये खेळाडूंच्या दुखापतींचे प्रमाण कसे वाढत आहे याकडेही अल्कराझने लक्ष वेधले. यंदाच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेला मुकलेल्या यानिक सिन्नेर, जॅक ड्रेपर, होल्गर रून आणि जोओ फोन्सेका या खेळाडूंची उदाहरणे त्याने दिली. ‘‘आपण पाहत आहोत की बरेच खेळाडू दुखापतग्रस्त आणि थकलेले आहेत. प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर भविष्यात हे प्रमाण आणखी वाढू शकते,’’ अशी भीती त्याने व्यक्त केली.

दुसर्‍या फेरीत फारियाची झुंज मोडीत

  • अमेरिकन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सरळ सेटमध्ये विजय मिळवणार्‍या अल्कराझला दुसर्‍या फेरीत पोर्तुगालच्या फारियाने झुंज दिली. फारियाने पहिला सेटही जिंकला. मात्र, यानंतर अल्कराझला सूर गवसला आणि त्याने सलग तीन सेट जिंकत पुढची फेरी गाठली. अल्कराझने लढतीत ४-६, ६-०, ६-३, ६-२ अशी सरशी साधली.
  • महिला एकेरीत सलग तिसर्‍या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या अरिना सबालेन्काने दुसर्‍या फेरीत पोलिना इयात्सेन्को हिचा अवघ्या ५३ मिनिटांत ६-१, ६-१ असा पराभव केला. जेसिका पेगुलाने सोफिया केनिनवर ५६ मिनिटांत मात केली. जेसिकाने लढत ६-३, ६-१ अशी जिंकली.
  • अन्य लढतीत विम्बल्डन उपविजेत्या कॅरोलिना मुचोवा हिने केटी बोल्टरचा ६-१, ६-० असा, अकराव्या मानांकित मार्ता कोत्स्युकने माजी उपविजेती स्लोआनी स्टिफन्सचा ६-१, ७-५ असा पराभव केला.
  • पुरुष एकेरीत आठव्या मानांकित बेन शेल्टनने ह्युबर्ट हुरकाझवर ६-३, ५-७, ७-६ (७-३), ७-५ असा, तर सातव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने सेबॅस्टियन गोर्झनीवर ६-३, ६-३, ७-५ असा विजय मिळवला. ग्रीसच्या बिगरमानांकित स्टेफानोस त्सित्सिपासने लॉइड हॅरिसचा ६-७(१-७), ६-३, ७-६ (७-४), ६-४ असा पराभव केला.
  • नियोजित कोर्टवरून दोन वेळा सामना हलविण्यात आल्यानंतर अखेर सहाव्या मानांकित ॲलेक्स डी मिनौरने इटलीच्या आंद्रिया ग्वेरीएरी याचा ६-२, ६-२, ६-४ असा पराभव केला. जोकोविचला पराभूत करणार्‍या अर्जेंटिनाच्या मारियानो नवोने याने आपली आगेकूच कायम राखताना इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीला ३-६, ६-३, ६-४, ७-६ (७-४) असे नमवले.

मानांकितांना धक्के : पुरुष एकेरीत १२वा मानांकित स्पेनचा राफेल जोदार, २३वा मानांकित आंद्रे रुब्लेव, १६वा मानांकित अमेरिकेचा ब्रेंडन नाकाशिमा यांना पराभवाचा धक्का बसला. जोदारला चीनच्या बु युनचाओकेते याने २-६, १-६, १-६ असे पराभूत केले.