न्यूयॉर्क : पुरुष एकेरीतील दुसरा मानांकित तारांकित खेळाडू स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि महिला एकेरीत अरिना सबालेन्का यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सहज विजय मिळवत आगेकूच केली.
अल्कराझने रोमन सफिउलिन याचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला. मनगटाच्या दुखापतीमुळे एप्रिल महिन्यापासून कोर्टपासून दूर राहिलेल्या अल्कराझने या स्पर्धेतूनच स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले. मात्र, या सामन्यात त्या दुखापतीचा कोणताही त्रास दिसून आला नाही. सामन्याच्या सुरुवातीपासूनच अल्कराझने चमकदार कामगिरी करताना रोमनला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. ‘‘मी पुन्हा एकदा स्पर्धेत खेळू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. पुढील सामन्यांमध्ये माझ्या टेनिसचा दर्जा नक्कीच आणखी सुधारेल. पहिल्या सामन्यात मी ज्या पद्धतीने खेळलो, त्यावर मी समाधानी आहे,’’ असे अल्कराझ म्हणाला.
पुरुष एकेरीत मात्र जोकोविचनंतर आणखी एका मानांकित खेळाडूला पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. स्टेफानोस त्सित्सिपासने सिनसिनाटी स्पर्धेतील विजेता आणि दहावा मानांकित आर्थर फिल्स याला ४-६, ७-६ (७-३), ६-१, ६-४ असे पराभूत केले. त्सित्सिपास अमेरिकन स्पर्धेत प्रथमच बिगरमानांकित म्हणून खेळत आहे. अन्य लढतींमध्ये अमेरिकेच्या आठव्या मानांकित बेन शेल्टनने टॉलन ग्रिक्सपूरला १-६, ६-१, ७-६ (७-३), ६-२ असे नमविले. तर, कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-ॲलिसिमेने रिंकी हिजीकातावर ७-५, ४-६, ६-३, ७-५ असा विजय मिळवला.
सबालेन्काची कॅमिलावर मात
’ महिला एकेरीत सबालेन्काने देखिल आपली लढत सहज जिंकली. कोलंबियाच्या तकिने कॅमिला ओसोरिओचा ६-४, ६-४ असाच पराभव केला. सेरेना विल्यम्सनंतर सलग तिसर्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी सबालेन्का प्रयत्नशील आहे.
’ महिला एकेरीत विम्बल्डन विजेत्या नोस्कोवाने पहिल्या फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या केटी व्होलिनेट्सचा ७-५, ६-१ असा पराभव केला. विशेष म्हणजे पहिल्या सेटला नोस्कोवा २-५ अशी मागे पडली होती. त्यानंतर सलग पाच गेम जिंकत तिने पहिला सेट जिंकला आणि नंतर दुसर्या सेटला व्होलिनेट्सला संधीच दिली नाही. त्याचवेळी उपविजेत्या कॅरोलिना मुचोव्हा हिने सिंज क्रॉस हिचा ६-३, ६-० असा पराभव केला.
’ आठव्या मानांकित इगा श्वीऑटेकने चीनच्या वांग झियुला ६-२, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमविले. तर, जपानच्या नाओमी ओसाकाने अनास्तासिया झाकारोव्हाला ७-६ (८-६), ७-६ (७-३) असे पराभूत करीत पुढची फेरी गाठली.
वावरिंकाची अपयशी अखेर वयाच्या ४१व्या वर्षी थेट प्रवेश मिळालेल्या स्टॅन वावरिंकाला निवृत्तीपूर्वीच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीने वावरिंकाचा ७-६ (७-४), ७-६ (७-३), ६-० असा पराभव केला. वावरिंकाने कारकीर्दीत २०१६ मध्ये नोव्हाक जोकोविचला हरवून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. लढतीनंतर स्पर्धा संयोजक आणि अमेरिका टेनिस संघटनेच्या वतीने वावरिंकाचा सन्मान करण्यात आला. ‘‘मी पूर्ण कारकीर्दीत टेनिसचा मनापासून आनंद लुटला आहे. माझे या खेळावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळेच माझ्या मनात टेनिसला कायमच स्थान राहिल,’’ असे वावरिंका म्हणाला.
