टेनिसचे वर्तमान आणि भविष्य म्हणून पाहिले जात असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझने नवइतिहास रचताना सर्वांत कमी वयात चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याची (करियर स्लॅम) किमया साधली आहे. आपला आदर्श राफेल नदालच्या उपस्थितीत अल्कराझने अप्रतिम खेळ करताना रविवारी झालेल्या अंतिम लढतीत नोव्हाक जोकोविचचा पराभव केला आणि कारकीर्दीत प्रथमच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

मेलबर्न पार्कवर जोकोविचने यापूर्वी उत्कृष्ट कामगिरी केली होती. जोकोविच या स्पर्धेत याआधी १० वेळा अंतिम लढतीत खेळला होता आणि प्रत्येक वेळी तोच विजेता ठरला होता. यंदा तो कारकीर्दीतील विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याचे ध्येय बाळगून खेळत होता. मात्र, अखेरीस तो जेतेपदापासून वंचित राहिला. पहिला सेट जिंकल्यानंतर ३८ वर्षीय जोकोविचला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. नव्या दमाच्या अल्कराझने अंतिम लढतीत २-६, ६-२, ६-३, ७-५ अशी बाजी मारली. यामुळे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच त्याने ‘करियर स्लॅम’ पूर्ण करण्याची कामगिरी केली. हे त्याचे कारकीर्दीतील एकूण सातवे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.

अल्कराझने याआधी विम्बल्डन, फ्रेंच आणि अमेरिकन या अन्य तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रत्येकी दोन वेळा जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत मात्र तो असे यश मिळवू शकला नव्हता. यंदा त्याने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याच्यासमोर जोकोविचसारख्या दिग्गज खेळाडूचे आव्हान असल्याने सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा होती आणि तेच झाले. प्रत्येक गुणासाठी चढाओढ पाहायला मिळाली. दोघांनीही आपली सर्व्हिस राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अनेकदा गेममध्ये ४०-४० अशी बरोबरी, मग एका खेळाडूला ‘ॲडव्हानडेज’, त्यानंतर दुसऱ्या खेळाडूचे पुनरागमन अशी स्थिती झाली. दोन्ही खेळाडूंनी दीर्घ रॅलिजवर भर दिला. यात बहुतेक वेळा अल्कराझ सरस ठरला. त्यामुळे अखेरीस त्याला विजय मिळविण्यात यश आले.

जेतेपद निश्चित झाल्यावर अल्कराझने रॅकेट हातून सोडली आणि तो कोर्टवर कोसळला. काही सेकंद तो याच स्थितीत राहिला. दुसऱ्या बाजूने जोकोविचने पुढे येत अल्कराझशी हस्तांदोलन करताना त्याचे अभिनंदन केले. एकीकडे अल्कराझ इतिहास रचण्यात यशस्वी ठरला, तर दुसरीकडे जोकोविच विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदापासून दूर राहिला. मात्र, या पराभवानंतर त्याने निवृत्तीबाबत भाष्य करणे टाळले. ‘उद्या काय होईल कोणास ठाऊक!’ असे म्हणत त्याने आपले मनोगत संपवले. परंतु ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील कामगिरीवरून तो यापुढेही खेळत राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सर्वांत कमी वयात चारही ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिसपटू

  • कार्लोस अल्कराझ (२२ वर्षे २७२ दिवस)
  • डॉन बज (२२ वर्षे ३६३ दिवस)
  • रॉड लेव्हर (२४ वर्षे ३२ दिवस)
  • राफेल नदाल (२१ वर्षे १०१ दिवस)
  • फ्रेड पेरी (२६ वर्षे १५ दिवस) चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा किमान एकदा जिंकणारा अल्कराझ एकूण नववा पुरुष टेनिसपटू ठरला आहे. याआधी फ्रेड पेरी (१९३५), डॉन बज (१९३८), रॉड लेव्हर (१९६२), रॉय एमर्सन (१९६४), आंद्रे आगासी (१९९९), रॉजर फेडरर (२००९), राफेल नदाल (२०१०) आणि नोव्हाक जोकोविच (२०१६) यांनी अशी कामगिरी केली आहे.

नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रथमच पराभव पत्करावा लागला. यापूर्वी जोकोविचने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची १० वेळा अंतिम फेरी गाठली होती आणि प्रत्येक वेळी तोच विजेता ठरला होता.

मला सर्वप्रथम नोव्हाकबाबत बोलायला आवडेल. तू केवळ टेनिसपटूच नाही, तर सर्वच खेळाडूंसाठी आदर्श आहेस. मीसुद्धा याला अपवाद नाही. तुझ्याविरुद्ध खेळताना मजा आली. ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेत होतो. मी आणि माझ्या चमूने मिळून अचूक योजना आखली. त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळेच मला हे यश मिळवता आले आहे. – कार्लोस अल्कराझ

अल्कराझ, तुझे अभिनंदन. तुझ्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी ‘ऐतिहासिक…अभूतपूर्व’ असेच शब्द वापरावे लागतील. भविष्यातील वाटचालीसाठीही तुला शुभेच्छा. मी स्वत:च्या भवितव्याबाबत आताच काहीही सांगू शकत नाही. उद्या काय होईल कोणास ठाऊक! मी आतापर्यंतच्या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेतला आहे, इतकेच आता सांगेन. – नोव्हाक जोकोविच